पनवेल : बातमीदार
मोठी रहदारी असलेल्या सायन-पनवेल महामार्गाच्या डांबरीकरणाऐवजी संपूर्ण रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्यातच पावसामुळे शिल्लक असणारी कामे सध्या येथे सुरू करण्यात आली आहेत. ही कामे पुढील वर्षीच्या फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार असून, ही कामे प्रगतिपथावर असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी दिली.
सायन-पनवेल महामार्गावरील संपूर्ण कामासाठी एकूण 68 कोटींचा खर्च अपेक्षित होता, परंतु वाढीव कामांमुळे हा खर्च 108 कोटींवर पोहचला आहे. पावसाळ्यात वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला कामासाठी मोठी कसरत करावी लागली. पावसाळ्यात वाहतुकीला अडथळा येणार नाही यासाठी खबरदारी घेण्यात येणार होती, मात्र अर्धवट कामामुळे ज्या ठिकाणाचे काँक्रीटीकरणाचे काम झाले नाही त्या ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागत आहेत. सध्या येथे शिरवणे, जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात दुसर्या टप्प्यातील काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने त्याचा फटका वाहनचालकांना बसत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. हे काम कधी पूर्ण होणार, अशी विचारणा वाहनचालक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. अखेर तीन ते चार महिन्यांत संपूर्ण महामार्गाच्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण होणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकारक व सुसाट होणार आहे, असा विश्वास संबंधित अधिकार्यांनी व्यक्त केला आहे.सायन-पनवेल महामार्गावरील टोलनाक्यापुढील कामोठेपर्यंत अनेक उड्डाणपूल आहेत. यातील काही सार्वजनिक बांधकाम विभाग, तर काही उड्डाणपूल एमएसआरडीसीकडे आहेत. महामार्गावरील 68 कोटींच्या कामात डांबराच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचे निश्चित करण्यात आले होते. उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना रस्ता 30-40 मीटरपर्यंत रुंद करण्यात येणार होता, परंतु संबंधित विभागांच्या पाहणीत यात 100 मीटरची वाढ झाली. त्यामुळे 15 कोटींची वाढ होऊन हे काम 77 कोटींवर गेले. कामोठे उड्डाणपुलाजवळच्या कामासाठी दिलेल्या नऊ कोटींच्या निविदेच्या कामात 18 कोटींची वाढ झाली. संबंधित कंत्राटदारांना डिसेंबर 2019पर्यंत काम पूर्णत्वाचा कालावधी असला तरी पावसाच्या वाढलेल्या कालावधीमुळे हे काम फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे टोलनाक्यापुढील वाशी गावाजवळ पुण्याच्या दिशेने मूळ असलेला तीन पदरी रस्ता पाच पदरी करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper