Breaking News

माथेरानमधील वाहनतळाच्या जागेत बांधकाम साहित्य

पर्यटकांची गैरसोय; वनव्यवस्थापन समिती, वनखात्याचे दुर्लक्ष

कर्जत : बातमीदार

माथेरानमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू आहेत. त्यासाठी लागणार्‍या बांधकाम साहित्याची साठवणूक दस्तुरी येथील वाहनतळाच्या जागेत करण्यात येत आहे. त्यामुळे माथेरनला येणार्‍या पर्यटकांना वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही, त्याकडे वनव्यवस्थापन समिती आणि वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे.

माथेरानमध्ये सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी आहे. त्यामुळे वनव्यवस्थापन समिती व वनखात्याने दस्तूरी नाका येथे वाहनतळ उभारले आहे. पर्यटक आपली वाहने तेथे उभी करुन माथेरानमध्ये येतात. मात्र माथेरानमध्ये सुरु असलेल्या विकासकामांसाठी लागणार्‍या जांभा दगड, सिमेंट, काळा दगड, पेव्हर ब्लॉक, ग्रीट इत्यादी बांधकाम साहित्याची या वाहनतळाच्या जागेत साठवणूक केली जात आहे. येथून हे साहित्य इच्छितस्थळी नेण्यास संबंधीत ठेकेदार अनुकूल दिसत नाहीत आणि त्याकडे वनव्यवस्थापन समिती व वनखात्याचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे पर्यटकांना पार्किंग बाबतच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

बहुसंख्य पर्यटक आपल्या वाहनाने माथेरानला येत असतात. दस्तुरीनाका येथील वाहनतळाच्या बहुतांश भागात सुशोभीकरणासाठी लागणारे साहित्य आणि जांभ्या दगड ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पर्यटकांना आपली वाहने कुठे व कशी उभी करावी, हा प्रश्न पडतो. वीकेण्डमध्ये तर वाहने उभी करण्यासाठी जागा उपलब्ध होत नाही. कित्येक पर्यटकांना यामुळे माघारी फिरावे लागत आहे. माथेरानचा दिवाळी पर्यटक हंगाम आत्ता सुरू होत आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढणार असून वाहनांचीसुध्दा गर्दी होणार आहे. वनव्यवस्थापन समिती आणि वनखात्याच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी पर्यटकांना पार्किंगबाबत होत असलेल्या अडचणींवर लवकरात लवकर पर्याय उपलब्ध करून घ्यावा, अशी मागणी होत आहे. अन्यथा याचा परिणाम माथेरानच्या पर्यटनावर होऊ शकतो, असे येथील नागरिकांन मधून बोलले जात आहे.

तर वनव्यवस्थापन समिती आर्थिक तोट्यात…

माथेरानचे वाहनतळ हे वनव्यवस्थापन समिती व वनखाते यांच्या अखत्यारीत येते. येणार्‍या प्रत्येक वाहनांची कर आकारणी केली जाते. त्यातून मिळणार्‍या  उत्पन्नातून वनखाते व वनव्यवस्थापन समिती माथेरानमध्ये विविध विकासकामे करीत असते. वाहनतळामध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे या जागेत वाहने उभी करण्याची संख्या घटू शकते. परिणामी वनविभागाला व वनव्यवस्थापन समितीला आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो असे स्थानिकांचे मत आहे.

वाहनतळासाठी तात्पुरती जागा देण्याची मागणी

पर्यटन हंगामात पर्यटकांच्या गाड्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे पार्किंग फुल होते व पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तो टाळण्यासाठी माथेरानमधील गव्हर्नर हिलकडे जाणार्‍या रस्त्यावर  तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्याबाबत वन व्यवस्थापन समितीने वनविभागाकडे मागणी केली आहे.

 दस्तूरी नाका येथील वाहनतळात 8 ते 10 ठेकेदारांनी बांधकाम साहित्य ठेवले आहे. ते साहित्य वेळेत उचलले जात नाही, ही गंभीर बाब आहे. वन विभागाने संबंधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी वन व्यवस्थापन समितीने सर्वसाधारण सभेमध्ये केली आहे.

योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, माथेरान

बहुसंख्य पर्यटक आपल्या गाड्या घेऊन येतात. माथेरानमध्ये एकमेव वाहनतळ आहे. पर्यटकांच्या गाड्या जर वाहनतळात उभ्या राहिल्या नाहीत तर माथेरानच्या पर्यटनावर परिणाम होईल. वाहनतळात साहित्य ठेवणार्‍या ठेकेदारांवर वनविभागाने कठोर कारवाई करण्याची गरज आहे.

-प्रकाश सुतार, माजी नगरसेवक, माथेरान

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply