Breaking News

निसर्ग चक्रीवादळात पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे नुकसान

पनवेल ः बातमीदार

साधारणतः दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे पनवेल तालुक्यातील 84 शाळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शाळांचे कौले, पत्रे उडाले असून भिंतीदेखील पडल्या आहेत. त्यामुळे या शाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

 निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यातील शैक्षणिक दालनांची वाताहत झाली. अनेक घरे, शाळा उद्ध्वस्त झाल्या. या वादळात शाळांच्या इमारतींची पत्रे उडून गेले, तर काही शाळांवर अवतीभवती असणारी झाडे व फांद्या कोसळल्या. काही ठिकाणी पावसाचे पाणी वर्गखोल्यांमध्ये शिरले. त्यामुळे शैक्षणिक साहित्य, पुस्तके, रंगरंगोटी केलेल्या भिंती, कपाट, महत्त्वाची कागदपत्रे भिजल्याचे समोर आले आहे. अनेक सुशोभित केलेल्या शाळांचे वादळात नुकसान झाले, तर काही खोल्या कोसळून जमीनदोस्त झाल्या आहेत. सुदैवाने या वेळी शाळा बंद असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. शाळांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून ग्रामस्थांच्या मदतीने काही ठिकाणी पडलेली झाडे व फांद्या तोडून परिसर मोकळा करण्यात आला आहे, मात्र काही शाळांची अवस्था खूपच गंभीर असल्याने शैक्षणिक वर्ष कसे सुरू करायचे, असा प्रश्न पडला आहे.  निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या तालुक्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. अनेक ठिकाणची वीज गायब झाली होती, तर काहींचे संसार उघड्यावर पडले. शाळेतील पाण्याच्या टाक्या, तर काही ठिकाणी वर्गखोल्यांच्या इमारती पडल्या आहेत. भिंतींना तडे गेले आहेत. स्वच्छतागृह पडली आहेत. अशा प्रकारे शाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील गव्हाण, आपटे, गुळसुंदे, वाजे, दुंदरे, लोणीवली, मोसारे, ओवेपेठ, कळंबोली, शिरवली, देवलोली, फणसवाडी, कासप, महालुंगी, पडघे, विहीघर, मुर्बी, मोरबे, चिंध्रन, जावळे यांसह 84 शाळांचे नुकसान झाले आहे. शैक्षणिक संस्था, शाळांच्या भौतिक व शैक्षणिक सुविधाही यात उद्ध्वस्त झाल्या आहेत. जुलै महिन्यापासून शाळा सुरू होणार असल्याचे शासनाच्या विचाराधिन आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या या शाळा कशा सुरू कराव्या, शाळांच्या डागडुजीचे काय, असे अनेक प्रश्न शाळा व्यवस्थापन आणि पालकांना पडले आहेत. त्यामुळे तातडीने शाळांची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply