Breaking News

‘मिसिंग लिंक’च्या ठेकेदाराला मारहाण; दोन जण गंभीर जखमी

खालापूर : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत नवीन मिसिंग लिंक मार्गाचे काम सुरू आहे. चावणी येथे पुलाचे काम सुरू असल्याने सध्या या परिसरात काही तरुण गुंडगिरी करीत असल्याचे समोर येत आहे. मागील दोन दिवसांत येथे शिवीगाळ, मारहाण व धमकावणे, तसेच काम करणार्‍या कंपनीच्या व्यवस्थापक व ठेकेदारांना मारहाण करण्याच्या घटना घडत आहे.

शुक्रवारी (दि. 5) रात्री ठेकेदार प्रकाश मोहिते आपल्या मशिनरीची पूजाअर्चा आटोपून घरी परतत असताना, समीर पांगारे, निलेश पांगारे, भरत पांगारे, दिनेश पांगारे व इतर 10 ते 12 सहकारी रा. तुकसाई खालापूर अशा तरुणांनी मौजे चावणी ते उंबरखेड रोड मध्ये उंबरखिंड या ऐतिहासिक पवित्र क्षेत्रात प्रकाश मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांना लाठ्याकाठ्या यांनी महागड्या कारची मोडतोड करून जबरी मारहाण केली. मोहिते जीव वाचवण्यासाठी पळत चावणी येथील वर्धाराजन बंगल्यात आश्रयास गेले. आरोपींनी पाठलाग करीत चावणी येथील वर्धाराजन यांच्या बंगल्याची मोडतोड केली, तर प्रकाश मोहिते यांना व त्यांच्या कुटुंबीयांना लोखंडी सळई, बार, लाठ्याकाठ्या यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले.

ठेकेदार प्रकाश मोहिते यांच्याकडे महिन्याला 60 हजार रुपये खंडणीची मागणी केली व न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या मारहाणीत प्रकाश मोहिते, सुभाष मोहिते, प्रवीण मोहिते, अरविंद मोहिते, तानाजी चव्हाण, संजू साळुंखे, पिंटू मोहिते लेबर यांना जबर मारहाण झाल्याने, जायबंदी झालेल्या जखमींना खोपोली येथील मोहिते यांच्या पार्वती रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील दोन जणांची प्रकृती गंभीर आहे. खालापूर पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बजरंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कराड तपास करीत आहेत. संशयित आरोपी फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अफकॉन कंपनीचे व्यवस्थापक शेंडे यांना त्यांच्या कार्यालयात घुसून मारहाण करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत पोलिसांनी दोन जणांवर कारवाई केली होती. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी दुपारी ऐन दिवाळीच्या सणात कंपनीच्या ठेकेदाराला जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. संशयित आरोपी हे एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे सांगण्यात येत असून या आरोपींना रायगड जिल्ह्यातील एका सत्ताधारी पक्षाच्या राजकीय मान्यवराचा वरदहस्त असल्याची चर्चा आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply