पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणार्या 70 उपक्रमांतर्गत राजे प्रतिष्ठान कामगार सेनेच्या वतीने पनवेलमधील अत्यंत गरजू अशा 10 महिला व 10 पुरुष रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्यात आली. राज्य शासनाने परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपये मदतीची घोषणा केली होती, मात्र प्रत्यक्षात पनवेल परिसरातील एकाही रिक्षाचालकाच्या खात्यात ही रक्कम जमा झालेली नाही. पनवेल परिसरात तब्बल 25 हजार परवानाधारक रिक्षाचालक अजूनही या मदतीची वाट पाहात आहेत. रिक्षाचालकांंना आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याबाबत त्यांनी राजे प्रतिष्ठान कामगार सेनेकडे आपली कैफियत सांगितली. याच जाणीवेतून महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेतून प्रतिष्ठानच्या वतीने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेलमधील अत्यंत गरजू रिक्षाचालकांना आर्थिक मदत देण्यात आली. राज्य सरकारतर्फे कधी मदत मिळेल ती मिळेल, मात्र राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे करण्यात आलेली मदत जरी छोटी असली तरी ती वेळेत मिळाली. याचा आनंद आम्हाला जास्त आहे, असे लाभार्थी रिक्षाचालकांनी सांगितले. या उपक्रमाच्या वेळी उद्योजक रमण खुटले, पनवेल तालुकाध्यक्ष अमित पंडित, नवीन पनवेल अध्यक्ष संतोष आमले, उपाध्यक्ष विजय दुन्द्रेकर, सचिव सुरेश भोईर, पनवेल अध्यक्ष अनुराग वाघचौरे, खांदा कॉलनी अध्यक्ष मछिंद्र पाटील, ओमकार महाडिक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.