सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील महत्त्वाचा असणारा जासई ते दादरपाडा रस्ता सध्या अपूर्ण अवस्थेत असल्याने हा रस्ता पूर्ण कधी होईल याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. कंत्राटदाराने रस्ता अर्धवट करूनही त्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जासई-दादरपाडा, दिघोडे हा उरण तालुक्यातील सर्वांत जुना रहदारीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. पूर्वी उरण पूर्व विभागातील जनतेला उरण या तालुक्याच्या ठिकाणी जायचे असल्यास याच मार्गाचा वापर होत होता.
कालांतराने उरणला विकासाचा स्पर्श होताच विविध ठिकाणी अनेक लहान मोठे उद्योगधंदे उभे राहिले.पर्यायाने या प्रवासी रस्त्यावरून जवजड वाहतुकीची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नेहमी निधी खर्च होऊ लागला. तरी या रस्त्यावर सतत मोठ्या प्रमाणात खड्डेच दिसून येत होते.
या रस्त्यावर दुरुस्तीसाठी सुमारे 60 लाखांचा निधी मंजूर होऊन यावर्षीच्या मे महिन्या अगोदर या रस्त्याचे काम सुरू होते, मात्र त्यांनी जासई ते दादरपाडा या रस्त्याचे काम अर्धवट करून त्यावर डांबरीकरण न करताच तसेच ठेवले. पर्यायाने पावसाळ्यात अवजड वाहतुकीमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी उद्ध्वस्त होऊन रस्त्यात खड्डे निर्माण झाले आहेत.
पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावर एमटीएम करून घेतले होते, परंतु पाऊस सुरू झाल्याने त्याच्यावर पुढील काम करता आले नाही आत्ता पावसाला संपला आहे. येत्या आठ दिवसांत त्याच्या पुढील काम ठेकेदाराकडून करून घेतले जाईल
-नितीन भोये, उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
‘15 दिवसांच्या काम सुरू करा, अन्यथा आंदोलन’
हा रस्ता पूर्ण होण्यासाठी जासई, चिर्ले, वेश्वी येथील ग्रामपंचायतींनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने जर 15 दिवसांच्या आत या रस्त्याच्या पूर्णत्वाचे काम सुरू झाले नाही तर वेश्वी, चिर्ले, जासई गावातील जनता रस्तावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा वेश्वी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विलास पाटील यांनी दिला आहे.