नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबईत वाहतूक पोलिसांनी दिवाळीत हेल्मेटविना प्रवास करणार्या दुचाकीचालकांवर एक विशेष कारवाई मोहीम हाती घेतली होती. यात सहप्रवाशालाही हेल्मेट नसल्यास दंड आकारला गेला. यात मागील 11 दिवसांत 12 हजार दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई केली. सोमवारपासून सिग्नल तोडणार्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेट नसल्यास दुचाकीचालकांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला असून कावरवाई सुरूच राहणार आहे.
नवी मुंबईत शीव-पनवेल महामार्ग तसेच पामबीच रस्त्यासह अंतर्गत मुख्य रस्त्यांवर भरधाव दुचाकी चालविणार्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात नियमानुसार हल्मेट सक्ती करीत ती चालकासह सहप्रवाशालाही बंधनकारक करण्यात आली आहे. मात्र अनेकदा दुचाकीचालकच हेल्मेट घालत नाहीत तर सहप्रवाशी कसे घालणार? यामुळे वाहतूक विभाग उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांच्या आदेशानुसार विशेष कारवाई मोहीम राबविण्यात आली.
वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकीस्वारांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर आता सिग्नल तोडणार्या वाहनचालकांवर सोमवारपासून विशेष कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम पाळा, असे आवाहन वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी केले आहे. 10 नोव्हेंबर रोजी केलेल्या कारवाईत पनवेल शहरात 135, तळोजात 102 तर खारघरमध्ये 64 कळंबोली 59 व नवीन पनवेलमध्ये 35 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
दुचाकीवरून प्रवास करताना दोघांनीही हेल्मेट घालणे हे सक्तीचे आहे. दुचाकीचालक हेल्मेट घालतो, परंतु सहप्रवासी हेल्मेट घालत नाही. त्यालाही हेल्मेट स्क्तीचे आहे. हा नियम न पाळणार्या दुचाकीचालकांवर 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. नागरिकांनी दुचाकीवरून जाताना दोघांनीही हेल्मेट घालणे आवश्यक आहे. यापुढे ही कारवाई सुरूच राहणार आहेत.
-पुरषोत्तम कराड, उपायुक्त, वाहतूक विभाग