पनवेल : प्रतिनिधी
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी राज्यव्यापी उपोषण सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पनवेल बस आगारातील एस. टी. कर्मचार्यांनी ही कामबंद आंदोलन भाग घेतल्याने पनवेल आगार बंद असून एकही गाडी सुटली नाही. त्यामुळे शुक्रवारी (दि. 12) आंदोलन चिरडून टाकण्यासाठी पनवेल आगारातील 15 कर्मचार्यांवर महामंडळाने निलंबनाची कारवाई केली आहे.
पनवेल आगारात एकूण 305 कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये चालक, वाहक व वाहन दुरुस्ती करणारे कर्मचारी आहेत. या संपामुळे पनवेल आगाराचे कामकाज ठप्प झाले आहे. या आंदोलनाचा फटका प्रवाशांना बसला आहे. पनवेल शहर हे दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबई, ठाणे, कल्याण आदींसह घाटमाथा, कोकणात पनवेल बस आगारातून गाड्या सुटत असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ याठिकाणी असते. आगारातील वाहक, चालक आणि कार्यशाळेतील कर्मचार्यांनी मागण्या जोपर्यंत मंजूर केल्या जात नाहीत, तोपर्यंत हा संप सुरू राहणार असल्याची भूमिका घेतल्याने हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी महामंडळाने पनवेल आगारातील तीन चालक, नऊ वाहक, एक कार्यशाळा कर्मचारी, एक वाहतूक नियमत्रक व एक चालक-वाहक (चावा) यांचेवर निलंबनाची कारवाई केली आहे.
पनवेल आगारातील 15 कर्मचार्यांवर निलंबनाची कारवाई केली असली तरी शनिवारी पनवेल आगारातून एक ही गाडी सुटली नाही. सकाळ आणि दुपारच्या शिफ्टमधील 22 कार्यशाळा कर्मचारी मात्र कामावर हजर झाले होते. पनवेल आगारातून बीईएसटीतर्फे सकाळी 8.45 पासून दिवसभरात 12 गाड्या चालवल्या जात आहेत.