Breaking News

पांढर्या कांद्याच्या मागणीत वाढ

उरण : वार्ताहर

पांढरा कांदा औषधी गुणधर्म, रुचकर, कमी तिखटपणा अशी विविध वैशिष्ट्य असलेला अलिबागचा पांढरा कांदा सालाबादप्रमाणे उरण बाजारात दाखल झाला आहे. नागरिक ह्या कांद्याला खरेदी करणे पसंत करीत असतानाचे चित्र उरण बाजार पेठेत दिसत आहे.

या कांद्याची ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये भात कापणी झाल्यानंतर लागवड केली जाते. अडीच महिन्यात या कांद्याचे पिक तयार होते. जितका पाऊस जास्त तितकी कांद्याची लागवड अधिक असते. या वर्षी कमी पाऊस झाल्याने कांदा लागवडीच्या क्षेत्रामध्ये घट झाली असली तरीही गादी वाफा यापद्धतीने कांदा लागवड केल्याने पारंपारिक पद्धतीच्या तुलनेत कांद्याचा आकार मोठा आहे. त्यामुळे या कांद्याला चांगला भाव मिळत आहे.

अलिबाग तालुक्यात कार्ले, खंडाळे, पवेळे, नेहुली, तळवली, खाणा-उसर, सोगाव-मारुती या परिसरात हा कांदा पिकवला जातो. रायगड जिल्ह्यात 250 हेक्टर वर पांढर्‍या कांद्याची लागवड होते. त्यापैकी एकट्या अलिबाग तालुक्यात 230 हेक्टरवर कांद्याची लागवड होते.

कांद्याच्या माळीत सध्या मोठ्या आकाराचे कांदे 200 ते 250 रुपये तर लहान आकाराचे कांदे 150 ते 175 रुपये माळ या दराने विकला जात आहे. सुटे कांदे 60 रुपये किलो या दराने आम्ही उरण बाजारात विकतो असे अलिबाग तालुक्यातील हशिवरा येथील कांदा विक्रेते सुजाता अशोक पाटील यांनी सांगितले.

पांढरा कांदा खायला रुचकर, औषधी, गुणकारी असल्याने आम्ही दर वर्षी कांद्याच्या माळी विकत घेतो. यंदा महाग आहेत, तरीही खरेदी करतो. दरवर्षी आम्ही पांढर्‍या कांद्याची वाट पाहत असतो.

-नंदकुमार मोरेश्वर ठाकूर, ग्राहक, केगाव-उरण

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply