Breaking News

सहाव्या दिवशीही एसटी आंदोलनाची धार तीव्र

कर्जत आगारात कर्मचार्‍यांचे कुटुंबीय आंदोलनात

कर्जत : बातमीदार

राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे आणि थकीत अनुदान, भत्ते याबाबत एसटी कामगार संघटना यांनी काम बंद आंदोलन केले आहे. कर्जत एसटी आगारातून मागील सहा दिवसात एकही एसटी गाडी बाहेर पडू शकली नाही. सर्व कामगार संघटनेच्या सदस्यांनी कामबंद आंदोलन केले. सहाव्या दिवशी शनिवारी (दि. 13) कामगारांना पाठिंबा देण्यासाठी सर्व कामगारांचे कुटुंबीय आंदोलनात सहभागी झाले. यात महिला, विद्यार्थी यांची उपस्थिती लक्षणीय आहे.

कर्जत तालुका एसटी आगार सोमवारपासून प्रवासी वाहतुकीसाठी बंद आहे. राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे आणि प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. कर्जत एसटी आगारातील सर्व चार कामगार संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या असल्याने सोमवारपासून एकही एसटी प्रवाशांच्या सेवेत निघाली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून आपल्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात यासाठी कामगार आंदोलनावर ठाम आहेत. दोन दिवस कर्जत आगारातील कामगार मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाले होते, मात्र सरकारकडून मागण्या मान्य होत नसल्याने कामगारांनी आंदोलन आणखी तीव्र केले आहे. शनिवारी कर्जत एसटी आगारात कामबंद आंदोलन करणार्‍या 93 कामगारांच्या पाठीशी त्या कामगारांचे कुटुंबीय समर्थन देण्यासाठी उतरले. कर्जतमध्ये निवासी असलेल्या कामगारांचे कुटुंबीय हे आज सकाळपासून आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यात महिला आणि विद्यार्थी यांचा समावेश असून सर्व कामगारांचे कुटुंबीय आंदोलन असेच सुरू राहिल्यास धडक आंदोलन करणार आहेत. एसटी कामगारांच्या आंदोलनाला कर्जत तालुक्यातील राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. त्यात पहिल्या दिवसापासून भाजप आणि वंचित बहुजन आघाडी यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

रोहा आगारातील आंदोलनाला भाजपचा पाठिंबा

धाटाव : प्रतिनिधी

राज्य शासनाच्या सेवेत त्वरित समाविष्ट करावे या प्रमुख मागणीसाठी राज्यातील जवळजवळ 98 हजार कर्मचारी संपावर गेले आहेत. सलग सहाव्या दिवशी एसटी कर्मचार्‍यांचा संप हा सुरूच आहे. आम्ही एसटी कर्मचार्‍यांच्या सोबत आहोत. त्यांच्या आंदोलनाला भाजप पाठिंबा देत आहे. त्याचबरोबर आम्ही त्यांच्या कुटुंबासोबत आहोत. त्यांच्या लढ्यात शेवटपर्यंत साथ देऊच, परंतु जोपर्यंत राज्य सरकार विलिनीकरण करून घेत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, अशा तीव्र शब्दांत दक्षिण रायगड भाजयुमोचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांनी इशारा दिला.

दरम्यान, रोहा आगारातील पाच कर्मचारी निलंबित करण्यात आलेले आहेत. यामध्ये सुरेंद्र येरुंकनर, विवेक मुंडे, राकेश बामुगडे, आचल जाधव, आशिष भावसार या कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले असून त्यांचे सलग सहाव्या दिवशी शुक्रवारी आंदोलन सुरूच आहे. मेलात तरी चालेल पण गांडुळाची अवलाद बनू नका, असे   बाळासाहेबांनी आम्हाला शिकवले आहे. राज्य सरकार विरुद्ध किंवा कोर्टाच्या विरुद्ध आम्ही काही बोललो तर तो अवमान ठरेल. आम्ही सरकारच्या कोणत्याही आमिषाला बळी पडणार नाही आणि जर पडलो तर या आमच्या तालुक्यात, शहरात, गावात आम्हाला कोणी मान देणार नाही. त्यामुळे आम्हाला शासनाने शासन सेवेत त्वरित समाविष्ट करून घ्यावे, असे निलंबित कर्मचारी सुरेंद्र येरुणकर यांनी सर्व आंदोलकांच्या वतीने सांगितले.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply