पनवेल : वार्ताहर
पनवेल तहसीलदार कार्यालय येथे पॅन इंडिया अवेरनेस कार्यक्रमाचा समारोप सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये जिल्हा न्यायाधिश आणि अध्यक्ष तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष माधुरी आनंद यांनी उपस्थितांना संबोधित केले.
त्या म्हणाल्या की, पॅन इंडिया अवेरनेस प्रोग्रॅम हा गेली 45 दिवस पनवेल परिसरात राबविण्यात येत असून याच्या माध्यमातून कायद्याची ज्ञानगंगा वेगवेगळ्या ठिकाणी व प्रामुख्याने खेडोपाडी आदिवासी बांधवांकडे पोहोचविण्याचे काम संपन्न झाले. त्याचा समारोप करताना एक वेगळी उर्जा घेऊन जात आहे.
शासनाचे जे विविध उपक्रम आहेत त्यांना अनुसरून 2 ऑक्टोबर गांधी जयंती ते 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू जयंती निमित्ताने गेले 45 दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात बेटी बचाव, बेटी पढाव, आदिवासींना कोर्टाची माहिती देणे, कामकाजाबद्दल माहिती देणे, मोफत सल्ला मोफत कायदे तज्ञांमार्फत देणे, वृक्षारोपण आदी विविध उपक्रम राबवून कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. याला लॉ स्टूडंट व सामाजिक कार्य करणार्या वकिलांनीसुद्धा पाठिंबा दिला व त्यांनी कायद्याची ज्ञानगंगा पोहोचविण्याचे काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास जिल्हा न्यायाधिश पनवेल जे.जे. मोहिते, तहसिलदार विजय तळेकर, पनवेल बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ, पनवेल महानगरपालिकेच्या उपायुक्त तृप्ती सांडभोर, सहदिवाणी न्यायाधिश आर. एस. भाकरे, सामाजिक कार्यकर्ते रवीशेठ पाटील, अॅड. चंद्रकांत मढवी आदी उपस्थित होते.
पनवेल बार असोशिएशनचे अध्यक्ष अॅड. मनोज भुजबळ यांनी सांगितले की, पक्षकार व वकिल यांचे संबंध चांगले असले पाहिजे. कायद्याची माहिती व त्याचा सदुपयोग करणे गरजेचे आहे. पहिल्यांदा कोर्टीत न जाता प्रथम तडजोड करून मार्ग काढावा. याने तुमचा वेळ, पैसा व मनस्ताप वाचत असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे अनुभव उपस्थितांनी सांगितले.
या निमित्ताने जिल्हा न्यायालय पनवेल येथून प्रभात फेरी काढण्यात आली. तिची सांगता पनवेल तहसिल कार्यालय येथे करण्यात आली. तसेच अभियान यशस्वी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.