Breaking News

कर्जतच्या जलकुंभाला अस्वच्छतेचा गराडा

कर्जत : बातमीदार

शहराला पाणी पुरवठा करणार्‍या जलकुंभाचा परिसर अस्वच्छतेच्या गराड्यात आहे. सर्वत्र धूम्रपान बंदी आहे, पण या पाणी साठवण टाकीच्या परिसरात धूम्रपान करणारे मनसोक्तपणे मजा लुटत असल्याचे सिद्ध होत आहे. दरम्यान, कर्जत नळपाणी योजनेच्या या टाकीजवळ असलेली अस्वच्छता ही रोगराई पसरविण्यास कारणीभूत ठरू शकते.

कर्जत शहराला पाणी पुरवठा करणारी पाण्याची टाकी तहसिल कार्यालयाच्या टेकडीवर आहे. येथील कार्यालये सायंकाळी बंद झाल्यानंतर तो परिसर निर्मनुष्य होतो. याचा फायदा धूम्रपान करणारे उचलत होते आणि त्यांनी मागील काही वर्षे तर कहर केला होता. त्यामुळे त्या टेकडीवर असलेल्या जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह आणि उपअभियंता कार्यालयात जाणारे गेट सायंकाळ नंतर बंद केले जाते. त्यामुळे धूम्रपान करणारे आता पाण्याच्या टाकीच्या खाली बसून आपली हौस भागवत आहेत. त्यावेळी दारूच्या बाटल्या, सिगारेटची पाकिटे ही त्याच ठिकाणी टाकून देण्याचे प्रकार वाढले आहेत. सर्वाधिक कचरा ज्या ठिकाणीं टाकण्यात येतो, अगदी त्याच ठिकाणावरून कर्जत शहराला पाणी वितरित केले जाते. पाणी सोडण्याच्या व्हॉल्व्हच्या आसपास टाकण्यात आलेल्या कचर्‍यामुळे कर्जतकर साथीच्या आजाराच्या उंबरठ्यावर उभे आहेत. या ठिकाणी पाण्याने भरलेले चेंबरदेखील कायम उघडे असते, त्यामुळे एखादे विषारी औषध त्या पाण्यात टाकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

ही बाब कर्जत नगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक धनंजय दुर्गे यांच्यापर्यंत आल्यानंतर त्यांनी त्या परिसराची तसेच पाण्याच्या टाकीची अचानक पाहणी केली. त्यावेळी नगरसेवक दुर्गे यांना धक्का बसला. या पाण्याच्या टाकीला जागोजागी भेगा पडलेल्या दिसून येत आहेत. त्यामुळे टाकीची दुरुस्ती करण्याची गरज निर्माण झाली असून नगरपालिकेने त्याकडे दुर्लक्ष केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना घडू शकते आणि त्यानंतर कर्जत शहरातील पाणी पुरवठा बंद होऊ शकतो. दुसरीकडे त्या ठिकाणी कोणत्याही स्वरूपातील सुरक्षा व्यवस्था कर्जत पालिकेकडून पुरविली जात नाही. त्यामुळे कर्जतकरांचे पाणी हे भावी काळात अनेक समस्यांना अडचणीचे ठरू शकते.

तहसिल कार्यालयाच्या टेकडीवर असलेल्या साठवण टाकीतून संपुर्ण कर्जत शहराला पाणी पाणीपुरवठा केला जातो. मात्र हा परिसर अस्वच्छ व असुरक्षीत ठेवून नगरपालिका नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. अशावेळी पाण्यातून विषबाधा तसेच साथीचे आजार उद्भवले तर नगरपालिकेच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावे लागतील.

-धनंजय दुर्गे, स्वीकृत नगरसेवक, कर्जत

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply