पाली : प्रतिनिधी
पावसाळ्यात सर्वत्र सरपटणारे जीव मोठ्या प्रमाणावर दिसून आले, पावसाळा नुकताच संपला आहे. या हंगामात साप, सरडे इत्यादी सरपटणारे प्राणी भक्ष्य व उष्णतेसाठी रस्त्यावर बाहेर फिरतात. खाद्य गोळा करण्यासाठी त्यांच्या हालचाली वाढत आहेत. मग बर्याच वेळा हे प्राणी रस्त्यावर येऊन वाहनांखाली चिरडून त्यांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना रोज विविध ठिकाणी शेकडोंच्या संख्येने घडत आहेत. यामुळे हजारो सापांचा जीव जात आहे. परिणामी त्याच्या संख्येत लक्षणीय घट होऊन पर्यावरणाचा समतोल ढासळण्याची व काही प्रजाती कमी होण्याची शक्यता आहे. याबाबत पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
साधारणतः दिवड, धामण, नानेटी, घोणस, तस्कर, मांजर्या, नाग, मण्यार इत्यादी व काही दुर्मिळ सापांचा रस्त्यावर चिरडून अधिक प्रमाणात मृत्यू होत आहे. शेतकर्यांसाठी सुद्धा हे प्राणी अधिक महत्त्वाचे आहेत. विशेषतः साप तर शेतकर्यांचा मित्रच आहे. हे सर्व सरपटणारे प्राणी आपल्या पर्यावरणाचे आणि संबंधित परिसंस्था अबाधित ठेवण्याचे काम करतात. अन्नजाळी आणि अन्नसाखळीत या प्रत्येक प्राण्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यातील एक जरी प्राणी विलुप्त झाला, तर अन्नजाळी आणि अन्नसाखळी खंडित होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडू शकतो.
साप, सरडे, बेडूक यांच्या प्रजननाचा हंगाम असल्याने या प्राण्यांची हालचाल वाढत आहेत. प्रामुख्याने रात्रीच्या व पहाटेच्या वेळी अधिक हालचाली असतात, तसेच खाद्य मिळविण्यासाठीही त्यांना फिरावे लागते दरम्यान हे प्राणी रस्त्यावर येतात आणि वाहनांखाली चिरडून मरतात. वाहनचालकांसमोर अचानक आल्याने त्यांना कधी कधी नाईलाजाने या प्राण्यांवरून गाडी न्यावी लागते. जर वाहनचालकांनी योग्य सावधानता बाळगत सुरक्षितपणे वाहन चालविले तर या प्राण्यांचा जीव वाचू शकतो, असे मत अनेक पर्यावरणप्रेमींनी मांडले आहे.
वाहने जपून चालवा
पर्यावरणाचे संतुलन राखण्यास साप, बेडूक व सरडे या प्राण्यांचे खूप मोठे योगदान आहे. या हंगामात वाहनांखाली चिरडून अनेक साप व सरड्यांचा मृत्यू ओढवतो. त्यामुळे या कालावधीत वाहनचालकांनी खबरदारी घेऊन अधिक दक्ष राहून वाहन चालविणे गरजेचे आहे. याबाबत अधिक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे अवाहन निसर्गप्रेमी संस्थांनी केले आहे. सोशल मीडियातून देखील याबाबत काही प्रमाणात जनजागृती होत आहे.