Breaking News

माथेरानमध्ये अनधिकृतपणे टेंटचा होतोय वापर

पर्यावरण खात्याचे दुर्लक्ष

माथेरान : रामप्रहर वृत्त

माथेरान हे एक पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील पर्यटन क्षेत्र आहे. येथील वनसंपदा व पर्यावरण राखण्यासाठी वनविभाग, हरित लवाद, पर्यावरण सनियंत्रण समितीसारख्या समित्या कार्यरत आहेत. त्यामुळेच माथेरानमधील जंगलांमध्ये हल्ली आढळून येणारे टेंट (तंबू) हा येथील चर्चेचा विषय ठरत आहे. हे असेच सुरू राहिले तर त्याचा येथील पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार आहे.

कोरोनाचे निर्बंध हटविल्यानंतर माथेरानमध्ये पर्यटकांचा ओघ सुरू झाला आहे, हल्ली सर्वत्र अ‍ॅग्रो टुरिझमचे पेव वाढत आहे. त्या ठिकाणी सर्रास टेंटचा वापर सुरू आहे व तरुणाईही या नव्या कल्पनेकडे आकर्षित होत आहे, पण माथेरान हे संवेदनशील पर्यावरण क्षेत्र आहे. येथे उघड्यावर कोठेही आग पेटविण्यास मनाई आहे. त्यामुळेच टेंटच्या वापरास माथेरानमधील सार्वजनिक जागेत मज्जाव आहे. तरीही येथील काही मंडळी सर्व नियम धाब्यावर बसवून काही ठिकाणी टेंट लावत आहेत. अशा ठिकाणी सुरक्षिततेची कोणतीही साधने उपलब्ध नाहीच, पण पर्यावरणाचा विचार देखील केला जात नाही. टेंटच्या ठिकाणी आग पेटविली जाते, तर उघड्यावरच मलमूत्र विसर्जन करून परिसरात घाण केली जात आहे. येथील जंगलांमध्ये मोठ्या प्रमाणात सर्प आढळून येत असतात व जंगलात असे टेंट लावणार्‍याच्या जीवास धोका उद्भवू शकतो, पण सुरक्षिततेचे सर्व नियम धाब्यावर बसवून टेंट उभे राहू लागले आहेत. काही महिन्यांपूर्वी अशाच येथील अलेक्झांडर हॉटेलमध्ये टेंटवर झाड पडल्याने त्यातील महिला गंभीर जखमी झाली होती.

अशा प्रकारचे सर्व नियम धाब्यावर बसवून निसर्गाची हानी करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी माथेरानमध्ये जोर धरू लागली असून येथील वनविभागाने आणि संयुक्त वनसमितीने अजूनही या टेंटवाल्यांवर का कारवाई केली नाही याबाबत सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply