नगराध्यक्षा प्रितम पाटील यांचे गौरवोद्गार
पेण : प्रतिनिधी
गणेशमूर्तीचे माहेरघर म्हणजेच रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात श्री गणेश मित्र मंडळ कुंभार आळी आणि येथील गणपती कारखानदारांनी राज्यस्तरीय गणेशमूर्ती प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन केले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी कलाकारांना प्रोत्साहन देताना नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी प्रदर्शनात पाहणी केलेल्या मूर्तीची वाहवा करून मूर्तिकारांची कला अप्रतिम असल्याचे सांगितले. कलाकारांनी सादर केलेल्या कलेबाबत बोलताना शब्दच सुचत नसल्याचे सांगितले. या वेळी अॅड. मंगेश नेने, नगरसेवक दर्शन बाफणा, प्रवीण पाटील, भास्कर पाटील, रवींद्र म्हात्रे, का. रा. पाटील आदी उपस्थित होते.
पेणमधील कुंभार आळीतील गणपती कारखानदारांनी अतिशय सुंदर संकल्पना मनामध्ये आखून फक्त आपल्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील कलाकार मूर्तिकारांच्या कलेला वाव देण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पेण येथील क्रीडा संकुलामध्ये गणेशमूर्ती प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन केले आहे.
या प्रदर्शनात फक्त पेणमधीलच नाही तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, मुंबई, ठाणे अशा राज्यांतील कानाकोपर्यातून मूर्तिकार सहभागी झाले आहेत. या वेळी नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी आयोजकांचे आभार मानून मूर्तिकारांच्या कलेला दाद दिली. एवढेच नव्हे तर अशा प्रकारचे प्रदर्शन याहून मोठे दरवर्षी राबवून ही संकल्पना अखंडित ठेवूया, असे सांगितले.