नगरसेवक प्रकाश बिनेदार यांचे प्रतिपादन
नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त
झोपडपट्टीवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन पनवेल महापालिकेचे नगरसेक प्रकाश बिनेदार यांनी केले. ते झोपडपट्टीवासीयांच्या नवनाथ नगर येथील शनिवारी (दि. 13) झालेल्या जाहीर सभेत संबोधित करीत होते. या वेळी नगरसेविका सुशीला घरत उपस्थित होत्या.
नवीन पनवेल भीमनगर झोपडपट्टी पाडण्यासाठी मोठ्या पोलीस बंदोबस्तात आलेल्या सिडकोच्या अतिक्रमणविरोधी पथकाला आमदार प्रशांत ठाकूर यांच्या ठिय्या आंदोलनामुळे कारवाई न करता माघारी जावे लागले होते. या पार्श्वभूमीवर नवनाथ नगर येथे झोपडपट्टीवासीयांची जाहीर सभा झाली. या सभेत पनवेल महापालिकेचे नगरसेवक प्रकाश बिनेदार यांनी झोपडपट्टीधारकांचे मत जाणून घेतले.
ते झोपडपट्टीवासियांना संबोधित करताना म्हणाले की, जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत एकाही झोपडीला हात लावून देणार नाही. आमदार प्रशांत ठाकूर हे झोपडपट्टीवासीयांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत. सभागृह नेते परेश ठाकूर हे पनवेल महापालिकेच्या माध्यमातून सातत्याने झोपडपट्टीवासीयांना स्वत:चे हक्काचे घर लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करीत आहेत. झोपडपट्टीधारकांसाठी डीपीआर 1,2 मंजूर झाला असून अडीच हजार घरांच्या निर्मितीसाठी टेंडर निघाला आहे. लवकरच या ठिकाणी प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. डीपीआर 3,4 हेदेखील केंद्र व राज्य शासनाकडून मंजुर करून घेऊन त्यांचेही टेंडर लवकरच काढले जाईल व दोन हजार घरे मिळवून देण्याची योजना राबवली जाईल,
असे बिनेदार यांनी सांगितले.
सिडकोच्या जागेवर असलेल्या झोपड्यांचा कोणताही सर्व्हे सिडकोने केलेला नाही. तसेच झोपडपट्टीवासीयांबाबत सिडकोने कोणतीही सकारात्मक भूमिका घेतलेली नसल्याची नाराजी या वेळी झोपडपट्टीवासीयांनी व्यक्त केली. यानंतर त्यांनी झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार्या माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर व सभागृह नेते परेश ठाकूर तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे या सभेतून आभार व्यक्त केले.
या सभेला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे प्रसिद्धीप्रमुख रावसाहेब खरात, उत्तर रायगड जिल्हा संयोजक राहुल वाहुळकर, सामाजिक कार्यकर्ते अशोक आंबेकर, भाजप झोपडपट्टी सेलचे पनवेल शहर अध्यक्ष चंद्रकांत मंजुळे, ज्येष्ठ कार्यकर्ते संजय जाधव, शांताराम कोळी, संतोष किर्तीकर, पसु शिंदे, भानुदास वाघमारे, तसेच जरीना शेख, नंदा टापरे, कविता गुप्ता, सुनिता सकपाळ, सुनिता पवार, आस्मा शेख, रेश्मा कांबळे, अमोल लहाने, सतिश बोरूडे, विजय झिरे, तानाजी शिंदे, किरण वाहुळकर, आनंद वाहुळकर, दिलीप जाधव, दीपक वाहुळकर, हिरामण साळुंखे, आनंद जाधव आदी उपस्थित होते.