विजेतेपदाला गवसणी
होबार्ट : वृत्तसंस्था
बाळंतपण आणि त्यानंतर आपल्या मुलाकडे लक्ष देण्यासाठी टेनिसपासून दुरावलेल्या सानिया मिर्झाने दणक्यात पुनरागमन केले आहे. डब्ल्यूटीए होबार्ट इंटरनॅशनल टेनिस स्पर्धेत 33 वर्षीय सानियाने आपली युक्रेनची साथीदार नादीया किचनॉकच्या साथीने दुहेरीचे विजेतेपद पटकाविले. अंतिम फेरीत सानिया-नादीया जोडीने चीनच्या शुई पेंग आणि शुई झँग जोडीचा 6-4, 6-4ने पराभव केला.
तब्बल दोन वर्षांनी सानिया मिर्झाने आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुनरागमन केले आहे. सानियाचे हे दुहेरीमधील 42वे विजेतेपद ठरले, तर सानिया बनल्यानंतरचा हा पहिलाच किताब आहे. 1 तास 21 मिनिटांत सानिया आणि तिच्या साथीदाराने हा सामना खिशात घातला.
सानियाने ऑक्टोबर 2017मध्ये शेवटची चायन ओपनची लढत दिली होती. ती टेनिसपासून दोन वर्षे दूर होती. या काळात तिने बाळाला जन्म दिला. हा ब्रेक घेण्यापूर्वी ती जायबंदीदेखील झाली होती. दोन वर्षांनंतर तिने टेनिस कोर्टवर यशस्वी पुनरागमन केले आहे.