पनवेल : प्रतिनिधी
महानगरपालिका निवडणूक विभाग प्रभाग क्रमांक अ खारघरमध्ये विविध ठिकाणी रविवारी (दि. 14) स्वीप 2021 अंतर्गत सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत एकदिवसीय मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये एकूण 205 अर्जांची ऑनलाइन नोंदणी झाली.
खारघरमधील सेक्टर 35 हाईड पार्क येथे 65 अर्जांची, अरिहंत अनन्य येथे 38 अर्जांची, सेक्टर-13 श्रीकृष्ण अपार्टमेंट येथे 44 अर्जांची सेक्टर-36 व्हॅली शिल्प येथे 58 अर्जांची नोंदणी करण्यात आली. अशा प्रकारे एकूण 205 अर्जांची ऑनलाइन नोंदणी या शिबिरात करण्यात आली.
मतदार नोंदणी शिबिरास पनवेल महापालिका उपायुक्त विठ्ठल डाके यांनी उपस्थित राहून मतदार नोंदणी करण्यासाठी नागरिकांचा उत्साह वाढवला व आयोजकांना शुभेच्छा दिल्या. या शिबिरासाठी लक्ष्यपूर्ती वेल्फेअर फेडरेशन खारघर, हाईड पार्क, को. हौसिंग सोसायटी कार्यकारी मंडळ खारघर, व्हॅली शिल्प को. हौसिंग सोसायटी कार्यकारिणी मंडळ खारघर, श्रीकृष्ण अपार्टमेंट कार्यकारी मंडळ खारघर, अरिहंत अनन्य को हौसिंग सोसायटी कार्यकारी मंडळ खारघर यांचे विशेष सहकार्य लाभले.