उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील चिरनेर-गव्हाण फाटा महामार्गावरील दिघोडे-जांभूळपाडा मार्गावर अवकाळी पावसामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाल्याने वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. या महामार्गावर दिघोडे-गव्हाण फाटादरम्यान असलेले कंटेनर गोदामातील अवजड वाहतुकीची वर्दळ अधिक प्रमाणात असून, या गोदामांना ट्रेलर पार्किंगच्या ठिकाणी काही कंटेनर उभे करण्यात येतात. त्यामुळे या गोदामांना अन्य कोणत्याही ठिकाणी पार्किंगची व्यवस्था नसल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला अवजड कंटेनर ट्रेलर पार्किंग करण्यात येतात. त्यातच या रस्त्यावर 24 तास वाहनांची सुरू असलेली वर्दळ यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचा ठरत आहे. अवकाळी पावसामुळे वाहतूूक कोंडी झाली होती. वाहतूक पोलिसांनी या महामार्गावर योग्यतेने लक्ष केंद्रित करून अवजड वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारल्यास येथील वाहतूक कोंडी कमी होण्याला मदत होईल, असे केअर ऑफ नेचर संस्थेचे अध्यक्ष राजू मुंबईकर यांनी सांगितले.