Breaking News

एसटी संपासंदर्भात परबांनी घेतली फडणवीसांची भेट

मुंबई : प्रतिनिधी

एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी गुरुवारी (दि. 18) थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा सागर बंगला गाठला. या वेळी त्यांनी फडणवीसांसोबत एसटी कामगारांच्या संपावर चर्चा केली. कोर्टाचे आदेश आणि एसटीची आर्थिक स्थिती यावरही या बैठकीत चर्चा झाली. या वेळी पगाराचा मुद्दा कसा सोडवायचा याबाबतच्या काही सूचना फडणवीस यांनी परब यांना दिल्या असून ही बैठक सकारात्मक झाल्याचे सूत्रांनी सांगितले.  भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांनी एसटी कामगारांच्या शिष्टमंडळासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अनिल परब यांनी सागर बंगल्यावर जाऊन फडणवीस यांची भेट घेतली. नंतर परब यांनी मीडियाशी संवाद साधला. एसटी कर्मचार्‍यांशी आजही चर्चा करण्यासाठी आम्ही तयार आहोत. फडणवीसांनीही या अनुषंगाने काही सूचना केल्या आहेत. त्या सूचनांचा आम्ही जरूर विचार करू. चर्चा सकारात्मक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असे परब म्हणाले. फडणवीस माजी मुख्यमंत्री होते. त्यांनीही राज्याचा कारभार केला आहे. त्यांनी काही सूचना केल्या आहेत. त्यावर आम्ही विचार करणार आहोत. याबाबतीत सर्व विचार करून शासनाचे मत घेऊन आम्ही त्यावर निर्णय घेऊ, असे सांगून ते म्हणाले की, काही प्रश्न कोर्टाच्या समितीसमोर आहेत. तर जे सरकारच्या आधीन आहेत ते प्रश्न सोडवले आहेत. फडणवीस म्हणाले की, फार काळ संप सुरू राहणे चांगले नाही, त्यामुळे लवकरात लवकर तोडगा काढून या समस्या निकाली काढाव्यात, आम्ही मदत करू, असे मी त्यांना सांगितले आहे. दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काहीना काही समाधानकारक तोडगा देऊन हा संप मिटवावा, असे म्हणाले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी प्रवाशी कर घेऊ नये, अशी मागणी केली आहे. त्यामुळे एसटीचे 700 ते 800 कोटी रुपये वाचणार आहेत. हा पैसा एसटी कामगारांच्या पगारासाठी वापरता येऊ शकतो. त्या अनुषंगाने आता राज्य सरकार विचार करण्याची शक्यता आहे, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयातून आल्यावरच या सर्व गोष्टी शक्य होणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply