नवी मुंबई : प्रतिनिधी
मोहने येथील गावदेवी मंदिरावर केडीएमसीच्या वतीने तीन दिवसापूर्वी कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक भूमिपुत्रांमध्ये मोठा रोष निर्माण झाला असून संतप्त जमावाचा पालिका अधिकार्यांसोबत वाद झाला. यामुळे शुक्रवारी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व भाजपचे विधान परिषदेचे आमदार रमेश पाटील यांनी मोहने येथील मंदिराच्या घटनास्थळाला भेट देऊन स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे त्यांनी शिष्टमंडळासोबत कल्याण परिमंडळ 3च्या पोलीस उपायुक्तांची भेट घेऊन स्थानिक भूमिपुत्रांवरील गुन्हे मागे घेण्याची व मंदिर उभारण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. मोहने येथे जुने गावदेवीचे मंदिर होते. ते मंदिर जीर्ण झाले असल्यामुळे स्थानिक गावकर्यांच्या लोकवर्गणीतून मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे, परंतु कोणतीही नोटीस न देता महापालिकेच्या वतीने सदरच्या बांधकामावर कारवाई करण्यात आल्याने या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. ही कारवाई हेतुपुरस्सर करण्यात आलेली असून या कारवाईमुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या आहेत. या वेळी मनपा प्रशासनाने मंदिराच्या कामात सहकार्य करणे गरजेचे आहे अन्यथा स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र आंदोलनाचा पवित्रा घेतील, असे आमदार रमेश पाटील यांनी सांगितले. याचप्रमाणे पोलीस उपायुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सोमवारी महापालिकेच्या आयुक्तांशी बैठक आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये या प्रश्नावर तोडगा निघेल अशी आशा असुन तोपर्यंत सर्व ग्रामस्थांनी शांत राहावे, असे आमदार रमेश पाटील यांनी आवाहन केले. या वेळी आमदार विश्वनाथ भोईर, माजी आमदार नरेंद्र पवार, देवानंद भोईर, सुभाष पाटील, अॅड. भावेश पाटील, सतीश देशेकर, अशोक मुरकुटे, सुभाष भाबडे तसेच कोळी महासंघाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.