पोलादपूर : प्रतिनिधी
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि जनजातीगौरव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदिवासी समाजबांधवांच्या कल्याणासाठी जिल्ह्यात कार्यरत असणार्या स्वयंसेवी संस्थांचा रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे नुकताच सत्कार करण्यात आला. या वेळी पोलादपूर तालुक्यात विशेष कार्य करणार्या धैर्य सामाजिक संस्थेला गौरविण्यात आले.
धैर्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ओंकार उतेकर आणि सचिव महेश सावंत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे यांच्यासह रायगड अन्य अधिकारी उपस्थित होते.
आदिवासी विद्यार्थी दत्तक उपक्रम, विद्यार्थी कौशल्य उपक्रम, सॅनिटरी पॅड वाटप आणि जनजागृती असे विविध सामाजिक उपक्रम धैर्य सामाजिक संस्था राबवित आहे. या सामाजिक कार्याची दखल घेत पोलादपूरचे निवासी नायब तहसीलदार शरदकुमार आडमुठे यांनी तालुक्यातून धैर्य सामाजिक संस्थेची शिफारस केली होती.