नवी मुंबई : बातमीदार – सर्व पक्षांतील चतुर पक्षी म्हणजे कावळा. मानवी वस्तीत राहून तो जास्तच हुशार झालेला दिसतो. सध्या उन्हाळा सुरू आहे. मनुष्यवस्तीत राहणार्या व मनुष्याशी एकरूप झालेल्या पक्षाचा विणीचा हंगाम सुरू झाला आहे. पावसाळ्या आधी या कावळ्यांचा विणीचा हंगाम त्यामुळे कावळ्यांची सध्या सर्वत्र चोचीतून घरटी बांधण्याची लगबग सुरू झाली आहे. त्यामुळे सध्या जिथे पाहावे तिथे कावळा व कवळी चोचीत काड्या, तारा, प्लास्टीक पट्ट्या, दोरे, वायर्स घेऊन उडताना दिसत आहेत.
कावळा हा पक्षांमध्ये सर्वात हुशार पक्षी. काळानुरूप व बदलत्या परिस्थितीनुसार या पक्षाने आपल्या सवयीही मनुष्याप्रमाणे बदलून घेतल्या आहेत. असे कोणतेही अन्न नाही की ते कावळा खात नाही. कोणत्याही प्रकारचे किडे, मांस, मानवी अन्न व मानवी विष्ठा सुध्दा कावळा खातो. ऋतू कोणताही असो इतर पक्षांसारखी साठवणूक करणे कावळ्याला जमत नाही. त्यामुळे रोज नवीन खाद्याच्या शोधात हा पक्षी दिसतो. सध्या उन्हाळा सुरू असून पावसाची चाहूल लागलेली आहे. साधारण एप्रिल व मे महिन्याच्या सुमारास कावळे घरटे बांधतात.
त्या दरम्यान त्यांचा विणीचा हंगाम सुरू झालेला असतो. त्यामुळे नेहमी आपल्या अन्नाकडे म्हणजेच कीटक, छोटे प्राणी, कबुतरे व चिमण्यांना मारण्याकडे लक्ष ठेवून तासनतास वाट बघत बसलेला कावळा आता घरटे बांधण्यात व्यग्र आहे. ही घरटी शक्यतो मानवी वस्तीच्या जवळ बांधली जात आहेत. मनुष्याच्या जवळ जात घरटे बांधणारा हा एकमेव पक्षी असावा. साधारण जमिनीपासून तीन ते पाच मीटर अंतरावर कावळे घरटे बांधतात. इतर पक्षांसारखी लहान काड्या व विणकाम केलेली घरटी कावळ्याला जमत नसले तरी मजबूत घरटे बांधण्याकडे कावळ्याचा कल असतो.