पर्यावरण मित्रांकडून नाराजी
कर्जत : बातमीदार
तालुक्यात मोठ्या प्रमाणात फार्महाऊसेसचे जाळे उभे राहत आहे. या फार्महाऊसेस बांधणार्या कंपन्यांकडून निसर्ग वाचविण्याचे सर्व नियम धाब्यावर बसवले जात आहेत. आपल्या फार्महाऊसकडे जाणारे रस्ते दर्शक फलक लावण्यासाठी झाडांचा वापर केला जात आहे. हे फलक लावण्यासाठी झाडांना मोठ्या प्रमाणात लोखंडी खिळे ठोकण्यात येत आहेत. या प्रकाराने पर्यावरणप्रेमी तरुण नाराज झाले आहेत.
धनिकांचे फार्महाऊस पाहून मध्यमवर्गीय लोकांनादेखील कर्जत तालुक्यात आपले फार्महाऊस असावेत असे वाटू लागले आहेत. त्यामुळे आता कर्जत तालुक्यातील कोणत्याही परिसरात गेले तरी फार्महाऊसेस सोसायटीची बांधकामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. या फार्महाऊसेसची माहिती व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील रस्ते नामफलकांनी व्यापले आहेत. त्यासाठी आता चक्क झाडांवर खिळे ठोकून बोर्ड लावण्याची नवीन प्रथा पडली आहे.
झाडांना खिळे ठोकून पत्र्याचे बोर्ड अडकवले जात आहेत. ते बोर्ड अडकवताना जिवंत झाडांना लोखंडी खिळे ठोकण्याचे सुरू असलेले प्रकार थांबवण्याची गरज पर्यावरणप्रेमी तरुणांकडून व्यक्त होत आहे. या प्रकाराबाबत पर्यावरणप्रेमी उदय पाटील यांनी वन विभागाकडे तक्रार केली आहे.
कर्जत तालुक्यातील रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांना लोखंडी खिळे ठोकून खिळखिळे करण्याचे प्रकार केले जात आहे. या खिळ्यांमुळे झाडाचे आयुष्य कमी होत असून, हा झाडे नष्ट करण्याचा प्रकार आहे. फार्महाऊसेस बांधणार्यांनी रस्त्याच्या कडेला लोखंडी फलक उभारून त्यावर फार्महाऊसची जाहिरात करावी, अशी सूचन उदय पाटील यांनी केली आहे.