कळंबोली : प्रतिनिधी
तळोजा सेक्टर 28 परिसरात बांधकाम व्यावसायिक बी. जी. शिर्के समूहाकडे काम करणार्या कामगारांच्या वस्तीला सोमवारी (दि. 22) दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत दोन जण जखमी झाले असून संपूर्ण वस्ती जळून खाक झाली आहे. तळोजातील पेंधर येथील सेक्टर 28 परिसरात सध्या सिडकोचा गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बी. जी. शिर्के ग्रुपच्या वतीने उभारण्यात येणार्या या प्रकल्पासाठी मोलमजुरी करणारे कामगार तेथे पत्र्याची घरे उभारून राहत आहेत. यातील एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला व आजूबाजूला असलेल्या एकूण 10 घरांना या आगीने आपल्या कवेत सामावून घेतले. एकूण दोन सिलिंडरचा स्फोट झाल्याने भीषण आग लागल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली. यात दोन जण जखमी झाले असून त्यांना बांधकाम व्यावसायिकांच्या व्यवस्थापनाने दवाखान्यात हलविल्याचे वृत्त आहे. दरम्यान, या संदर्भात बी. जी. शिर्के समूहाचे अधिकारी राहुल कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.