Breaking News

पनवेल, उरण, कर्जतच्या मतदारांवर मावळची मदार

उरण : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक मतदार पनवेल, उरण आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील आहेत. त्यामुळे मावळ लोकसभेचा खासदार हे तीन विधानसभा मतदारसंघ ठरवणार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

लोकसभा मतदारसंघ पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार फेब्रुवारी 2008मध्ये राज्यात मावळ हा एक नवीन मतदारसंघ अस्तित्वात आला. खंडाळा घाटाच्या वरील मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि कोकणातील कर्जत, पनवेल, आणि उरण हे तीन अशा एकूण सहा विधानसभा मतदारसंघाचा हा लोकसभा मतदारसंघ अनेकांना बुचकाळ्यात टाकणारा आहे. भाषा, प्रांत आणि संस्कृतीबाबत भिन्न असलेले पश्चिम व कोकण हे दोन प्रदेश या मतदारसंघामुळे एक आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या दोन लोकसभा निवडणुकीत उमेदवार घाटावरचा आणि सर्वाधिक मतदार कोकणातील असे चित्र आहे. दोन्ही निवडणुकीत या मतदारसंघावर शिवसेनेचे प्राबल्य राहिले आहे. मतदार पुनर्रचनेनंतर झालेल्या पाहिल्या निवडणुकीत गजानन बाबर आणि दुसर्‍या निवडणुकीत श्रीरंग बारणे हे दोन शिवसेनेचे खासदार या मतदारसंघाने देशाला दिलेले आहेत.

गेल्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचा नवखा उमेदवार तिसर्‍या क्रमांकावर फेकला गेला होता. यंदा राष्ट्रवादीने माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा नातू पार्थ पवार याला उमेदवारी दिली आहे. शिवसेना-भाजप युतीत ही जागा ठरल्याप्रमाणे शिवसेनेच्या वाट्याला आली असून, पवार विरुद्ध बारणे अशी लढत निश्चित मानली गेली आहे. या दोन्ही उमेदवारांची खरी मदार पनवेल, उरण आणि कर्जत या विधानसभा मतदारसंघांवर आहे. या तीन मतदारसंघांचे प्रतिनिधित्व अनुक्रमे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेनचे आमदार मनोहर भोईर, राष्ट्रवादीचे आमदार सुरेश लाड हे करीत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघातील एकूण 19 लाख मतदारांपैकी 10 लाख 76 हजार मतदार हे या तीन कोकण विधानसभा मतदार संघातील आहेत.  बारणे यांना गेल्या वेळच्या निवडणुकीत पाच लाख 12 हजार 226 मते मिळाली होती. ही टक्केवारी 43.62 टक्के असून, यातील 40 टक्के मतदान हे घाटाखालच्या तीन मतदारसंघातील आहे. त्यामुळे कोकणातील मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply