आयुक्त गणेश देशमुख यांचे प्रतिपादन
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेला स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरा मुक्त शहरांसाठीचा पुरस्कार मिळाला. नागरिकांचा प्रतिसाद, लोकप्रतिनिधींचे सहकार्य आणि जनेतेने केलेले प्रयत्न यासाठी महत्वाचे ठरल्याचे महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी सोमवारी (दि. 22) पत्रकार परिषदेत सांगितले.
स्वच्छ सर्वेक्षण-2021 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण, सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज आणि कचरा मुक्त शहरांसाठीचा पुरस्कार शनिवारी केंद्रीय नागरी विकास व गृह निर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात पनवेल महापालिकेला प्रदान करण्यात आला. महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर जगदीश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकुर, महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर, उपायुक्त सचिन पवार, गणेश शेटे, सहायक आयुक्त डॉ. वैभव विधाते, आदिंनी हा पुरस्कार स्विकारला.
पनवेल महापालिकेस नागरिकांचा सक्रिय सहभाग यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरीचा देशात प्रथम क्रमांक मिळाल्या बद्दल केंद्रशासनाने विशेष पुरस्काराने महापालिकेला गौरवले. तसेच कचरामुक्त शहर या मध्ये 3 स्टार नामांकन मिळाल्याबद्दल ही पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्याची माहिती देण्यासाठी सोमवारी आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती देताना नागरिकांचा प्रतिसाद, लोकप्रतींनिधींनाचे सहकार्य आणि जनेतेने केलेले प्रयत्न यामुळेच हे शक्य झाल्याचे सांगुन त्यांनी नागरिकांचे अभिनंदन करून आभार मानले. पुढील वर्षी 5 स्टार नामांकन मिळवण्याचे उद्दीष्ट असल्याचे सांगितले. 1500 आरोग्य विभागाचे कर्मचारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अभियंते, कर्मचारी, लोकप्रतिनिधी, त्या त्या प्रभागातील नगरसेवक यांच्या कष्टामुळे आपण हा टप्पा गाठू शकल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस अतिरीक्त आयुक्त त्रृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, गणेश शेट्टेे, सहाय्यक आयुक्त वैभव विधाते, वंदना गुळवे, सुवर्ना दखने यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
दरम्यान, या वेळी पनवेल महापालिकेला पुरस्कार मिळाल्याबद्दल भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नाना मकदूम, नगरसेवक जगदीश गायकवाड, युवानेते हॅपी सिंग यांच्यासह अनेक संघटना, पदाधिकार्यांनी आयुक्त गणेश देशमुख यांचे पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.