काल कुणालाही कल्पना न देता तातडीची पत्रकार परिषद घेऊन माजी आमदार सुरेश लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रायगड जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. विशेष करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एका समारंभासाठी दिवेआगर येथे आले होते आणि त्याच वेळी लाड यांनी राजीनाम्याचे हत्यार उचलले. त्यामुळे उलटसुलट चर्चा होत आहे. राजीनाम्याचे कारण प्रकृतीचे असले तरी खरे कारण महाआघाडीमध्ये होत असलेली त्यांची घुसमट हे आहे. त्यांच्या या राजीनाम्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले असून मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसची बसलेली घडी मात्र विस्कळीत होईल, हे नक्की.
सुरेश लाड यांनी तीन वेळा विधानसभेमध्ये या मतदार संघाचे नेतृत्व केले. पाच वेळा निवडणूक लढवून ते दोन वेळा पराभूत झाले ते आघाडीतील बेबनावामुळे आणि काही अंशी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या ‘कर्तृत्वा’मुळे हे कटुसत्य आहे. मागच्या निवडणुकीतील त्यांचा पराभव त्यांच्या खूप जिव्हारी लागला. त्यातच नगर परिषदेतील नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत त्यांच्या कन्येचा पराभव हासुद्धा त्यांच्या मनाला डळमळीत करणारा ठरला. मागील विधानसभा निवडणुकीत ‘शिवसेनेच्या वाटेवर’ असताना त्यांची खासदार सुनील तटकरे यांनी समजूत काढून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी त्यांना दिली. त्या वेळी ते निवडणूक लढविण्याच्या मनस्थितीत नव्हते. तरीही पक्षाचा आदेश म्हणून ते निवडणूक रिंगणात उतरले, परंतु त्यांचा पराभव झाला. या पराभवाची कारणे अनेक आहेत. आघाडीत असलेल्या शेकापने उघड उघड विरुद्ध काम केले. इतकेच नाही तर पक्षातील काही कार्यकर्त्यांनी सुद्धा आतून विरोधकांना मदत केली, तर कुणी म्हणते लोकसभेलाच हे सारे ठरले होते. काहीही असो लाडांची विजयाची हॅट्रिक मात्र हुकली हे खरे.
पराभवानंतर लाड यांनी पुन्हा काम सुरू केले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली, मात्र त्याच वेळी नेमके कोरोनाचे महाकाय संकट आले. त्यामुळे पक्ष संघटनेचे काम करण्यात अडचण उभी राहिली. तरीही त्यांनी अनेक वर्षे पदे सांभाळत असलेल्या पदाधिकार्यांना बढती दिली व नवीन पदाधिकार्यांची नियुक्ती केली. त्यातच कोरोनाचे संकट हळूहळू कमी होऊ लागले. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीच्या निवडणुका होण्याची शक्यता निर्माण झाली. उमेदवारांची चाचपाणीही सुरू झाली. काही विभागात बैठकाही सुरू झाल्या आणि या निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढविणार असे जाहीर झाले. योगायोग असा की त्याच वेळी माजी आमदार लाड यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा दौराही पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीची चाचपणी सुरू झाली, मात्र लाड यांना कोणतीही कल्पना न देता काही पदाधिकार्यांनी युती, आघाडीच्या बैठका घेतल्या. त्यामुळे लाड यांचा स्वाभिमान दुखावला. कोणाशीही युती किंवा आघाडी करण्यात माझा ‘अडसर’ नको म्हणून त्यांनी पद सोडण्याचा निर्णय पक्का केला आणि तो लगेचच तातडीची पत्रकार परिषद घेऊन जाहीरही केला. पत्रकार परिषदेत त्यांनी मी कोणतेही महामंडळ मागितले नाही आणि तरीही पक्षाने दिले तरी मी स्वीकारणार नाही. असे उत्तर दिल्याने ते किती नाराज आहेत ते दिसून येते, मात्र आगामी विधानसभा निवडणूक लढणार काय? यावरही त्यांनी ‘अब तो दिल्ली बहोत दूर है।’ असे सांगून तो विषय त्यांनी गुलदस्त्यातच ठेवलाय.
ते राजीनाम्याचे कारण प्रकृतीचे देत असले, तरी खरे कारण पक्षामध्ये होत असलेली घुसमटच आहे. महाविकास आघाडीची सत्ता असली तरी त्यांचे आणि विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचे अद्यापपर्यंत कधीच जुळले नाही आणि पुढील किती दिवस असेच राहील हे सांगता येत नाही. कारण पत्रकार परिषदेत त्यांनी तशा भावना परखडपणे व्यक्त केल्या होत्या. लाड यांनी आपला निर्णय जाहीर करण्याचा दिवस सुद्धा असा निवडला की दिवेआगर येथे त्याच वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनेत्रा पवार, खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे आदी समारंभात गुंतले असल्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयापासून कुणीही त्यांना परावृत्त करू नये हाच त्यांचा हेतू होता. लाड यांच्या राजीनाम्यामुळे मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसची घडी विस्कटणार आहे. कर्जत तालुक्यात सुरेशभाऊ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी ज्या कार्यकर्त्यांची प्रामाणिकपणे भावना आहे, ते जो निर्णय घेतील तो आमच्यासाठी शिरसावंद्य आहे, अशी भावना असंख्य कार्यकर्त्यांची आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींपुढे मोठा पेच उभा राहिला आहे. आगामी निवडणुकांसाठी रिक्त असलेले पद लवकरात लवकर भरावे लागेल, मात्र राजीनाम्यामुळे मतदारसंघातील पक्षाची घडी बिघडणार आहे.
-विजय मांडे, विश्लेषण