Breaking News

असा घेता येतो मल्टिबॅगर्सचा शोध

आपल्या अभ्यासाबद्दल प्रचंड खात्री व केलेली गुंतवणूक सांभाळून ठेवण्याचं धैर्य ज्याच्याकडे आहे, त्याला बाजारात मल्टिबॅगर्सचा शोध घेणे अवघड नाही. कोणते आहेत अशा मल्टिबॅगर्सचे निकष?

मल्टिबॅगर्स शोधण्याआधी सर्वप्रथम आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण मल्टिबॅगर्स हे एखाद दोन वर्षांत ठरत नाहीत तर त्यासाठी बराच संयम ठेवावा लागतो. अशा चांगल्या कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वर्षोनुवर्षे तसेच पडून असतात आणि मग आपण जर त्यात गुंतवणूक केली असेल तर इतर शेअर्स वाढताना पाहून आपल्याला वाटते की आपण घेतलेल्या शेअर्समध्ये काही दम नाही आणि आपण ते किरकोळ नफ्यात विकून टाकतो आणि काही वर्षांनी आपणास पश्चात्ताप होतो. 

अनेक वेळा काही गुंतवणूकदार असे चांगल्या कंपन्यांचे शेअर्स नाकारतात आणि कमी किमतीच्या शेअरकडं त्यांचा कल असतो. परंतु, इथं आपण स्वतःचीच फसगत करत असतो. शेअरचा भाव कमी म्हणजे तो शेअर स्वस्त असं कधीच नसतं. याउलट उत्तम कंपन्यांचे शेअर्स हे थोडे महागच असतात कारण प्रत्येकाची नजर अशाच कंपन्यांवर असते. उदा. बाजारानं तळ गाठला होता तेव्हा म्हणजे मार्च अखेरीस आयडिया या प्रसिद्ध कंपनीच्या शेअरचा भाव होता रु. 18, जो त्याच एका महिन्यात निम्मा झाला होता म्हणून लोकांनी स्वस्त मिळतोय म्हणून खरेदी केला व आज संपूर्ण बाजार तळापासून सुमारे 40% वर आलाय मात्र आयडियाच्या शेअरचा भाव आहे रु. 9 म्हणजे अजून अर्धा. समजा त्यावेळी आयडियाचे शंभर शेअर्स खरेदी करण्याऐवजी त्याच 1800 रुपयांमध्ये सर्वांच्या परिचयाच्या अशा टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे आठ शेअर्स आले असते व त्याच आठ शेअर्सचं मूल्य आज रु. 4300 असलं असतं. त्यामुळं, कमी किंमतीचे फुटकळ (पेनी) शेअर्स भविष्यात भरीव परतावा देऊ शकतात तर जास्त किंमत असणारा शेअर जास्त परतावा देऊ शकत नाही, हा गैरसमज साफ चुकीचा आहे.

यासाठी अजून एक उदाहरण पाहू. मार्च 2000 साली एमआरएफ या प्रसिद्ध टायर कंपनीचा एक शेअर 6000 रुपयांना होता. जर त्यावेळेस कोणासही या एका शेअरमध्ये गुंतवणूक करावयास सांगितलं असतं तर सहा हजार रुपये गुंतवून केवळ एकच शेअर घेतला असं नको म्हणून कोणी नवख्या गुंतवणूकदारानं याकडं दुर्लक्ष केलं असतं, परंतु बरोबर दहा वर्षांनी याच एका शेअरचा भाव 6000 वरून 73000 वर पोहचलेला दिसून येतो. म्हणजे दहापट फायदा. याच उलट त्याच सुमारास रिलायन्स कम्युनिकेशनच्या एका शेअरचा भाव होता रु. 173 व आज दहा वर्षांनंतर भाव आहे केवळ रु. 2.35, म्हणजे 98.6 % नुकसान. तशीच कथा जॉकी या ब्रॅण्डच्या चड्ड्या बनवणार्‍या पेज इंडस्ट्रीज कंपनीची, 800 रुपयांवरून 36000.  वरवर पाहता विचार केल्यास, चड्ड्या बनवणार्‍या कंपनीत कोणी गुंतवणूक केलेली असल्यास काय परतावा अपेक्षित ठेऊ शकतो हे ज्याचं त्यानं ठरवावं. परंतु अशा कंपन्यांचं लपलेले मूल्य बाजारास माहित झाल्यावरच त्यावर गुंतवणूकदारांच्या उड्या पडणार आणि तेथूनच मल्टिबॅगर्सचा खरा प्रवास चालू होणार. मात्र त्यासाठी आपल्या अभ्यासाबद्दल प्रचंड खात्री व केलेली गुंतवणूक सांभाळून ठेवण्याचं धैर्य असणं आवश्यक आहे.

ज्या क्षेत्रामध्ये वाढीसाठी खूप वाव असतो अशा उद्योगधंद्यांमध्ये अशा कंपन्या आपण शोधू शकतो ज्यामध्ये चांगली मूलतत्त्वे, उत्तम व्यवस्थापन, चांगला कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कमी प्रमाणात असलेले भाग-भांडवल, शून्य अथवा कमी कर्ज, प्रवर्तकांची जास्त हिस्सेदारी आणि उत्तम दीर्घकाळ चालू शकणारं एखादं अनन्य उत्पादन अशा गोष्टी त्या कंपनीचं सक्षमीकरण करू शकतात. त्यातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे भविष्यातील कमाईची वाढ.

सर्वप्रथम असं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे की ज्यामध्ये पुढील पाच ते दहा वर्ष खूप प्रगती साधण्यास वाव आहे, खासकरून नवीन क्षेत्रं. (ओला/उबेर/ओयो हॉटेल्स यांचे व्यवसाय)

कमीत कमी कर्ज – कमीतकमी कर्ज असल्यास ती फेडावयासाठी लागणारी रक्कम व कर्जापोटी व्याज भरपाईची रक्कम तितकीच लहान व म्हणून नफ्याचं मार्जिन जास्त.

स्पर्धात्मक फायदा – सरासरीपेक्षा जास्त नफा मिळवण्याबरोबरच कंपनीची तिची स्थिरता देखील तितकीच महत्वाची आहे. उच्च नफा वाढीमागील घटक तितकेच महत्वाचे आणि हे घटक जोपासणार्‍या बाबींची क्षमता व्यापक हवी. त्याचबरोबरीनं अडीअडचणीच्या दिवसांत कंपनीकडं अशा विषम परिस्थितीत तग धरून ठेवण्याची क्षमता देखील हवी. 

बाजारातील मोठा हिस्सा संपादन करणारा तगडा ब्रँड, कमी उत्पादन व इतर खर्च आणि एक अद्वितीय उत्पादन श्रेणी या गोष्टींच्या मदतीनं कंपनी इतर कंपन्यांपेक्षा स्पर्धात्मक फायद्याचा लाभ घेऊ शकते.

अर्थातच बाजार पडताना केलेला अशा कंपन्यांचा शोध आपल्याला गुंतवणुकीची नवी उर्मी देऊन जातो हे नक्की.

सुपरशेअर

रेल विकास निगम लिमिटेड

आजच्या प्रमुख विषयानुरूप असणारी कंपनी म्हणून या सरकारी अखत्यारीतल्या कंपनीकंडं पाहता येऊ शकतं. या कंपनीचा सुमारे 88% हिस्सा हा सरकारकडं आहे. आरव्हीएनएल रेल्वे मंत्रालयाची विस्तारित शाखा म्हणून आणि रेल्वे मंत्रालयाच्या वतीने काम करत आहे. तसंच, इतर केंद्र सरकारच्या व राज्य सरकारच्या अखत्यारीतील प्रोजेक्ट्स देखील याच कंपनीकडं वळवली जातात. 2013 मध्ये या कंपनीस मिनी रत्न म्हणून गौरवलं गेलं आहे. सध्या कंपनीकडं पूल बांधणं, ऍप्रोच रोड तयार करणं अशी किरकोळ कामं आहेतच, त्याखेरीज रेल्वेमार्ग दुहेरीकरणाची सुमारे सत्तर कंत्राटं आहेत. तर विद्युतिकरणाची पंचवीसेक काम हाती आहेत. त्याखेरीज गॉज कन्व्हर्जन व एम.टी.पी.ची सुमारे 10000 कोटी रुपयांची कामं हाती आहेत. मागील महिन्याच्या शेवटास कंपनीनं रु. 1.14 प्रति शेअर (11.4 टक्के) लाभांश जाहीर केलेला आहे. मागील तीन वर्ष कंपनीची विक्री वाढ ही सरासरी 30 टक्क्यांहून जास्त असून कंपनीचा भाव हा सध्या आपल्या पुस्तकी मूल्याच्या खाली आहे. भारत निर्माण योजनेवर विश्वास असल्यास या कंपनीचे शेअर्स पुढील दशकात मल्टिबॅगर्स ठरू शकतो.

वरच्या पातळीवर बाजाराची घुसमट

महागाईच्या वाढत्या आकड्यांची बाजारात नफेखोरीस प्राधान्य दिलं गेलं आणि गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात बाजार नरम राहिला. निफ्टी 50 निर्देशांक 35 अंशांनी तर सेन्सेक्स 163 अंशांनी घसरला. बाजाराची वरील बाजूस होत असलेली घुसमट गेला आठवडाभर जाणवत होती. तांत्रिकरित्या निफ्टी 50 ला 11350-11400 च्या दरम्यान अडथळा अनुभवायला मिळत होता परंतु वरील बाजूकडील प्रतिकार मोडून काढायला लागणारं बळ कमी होत चाललेलं आढळून येत होतं. त्यामुळं पहिले चार दिवस बाजार जिथल्या तिथं राहून शेवटच्या दिवशी मात्र कोसळला. गेल्या आठवड्यात निफ्टीच्या 50 शेअर्समधून जेएसडब्लू स्टीलचे शेअर्स 10 टक्क्यांनी वाढले तर आयशर मोटर्सचे शेअर साडेसात टक्क्यांहून अधिक घसरले. या आठवड्यातही निफ्टीसाठी 11100 व 10800 ह्या आधार पातळ्या राहतील तर 11380 व त्यापुढं 11550 ह्या प्रतिकार पातळ्या राहू शकतील. सोन्याचे भाव आपल्या उच्चतम भावापासून 6-7 टक्के घसरले आणि अजून 4-5% घट येणार्‍या दिवसांत अपेक्षित आहे. 15 ऑगस्टपासून चीन व अमेरिका यांच्या बोलण्यांना सुरुवात होत असल्यानं काही सकारात्मक गोष्टी निष्पन्न झाल्यास त्या बाजारास नवीन उभारी मिळवून देतील, हीच आशा. 

–     प्रसाद ल. भावे (9822075888)

sharpadvisers@gmail.com

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply