कर्जत : बातमीदार
माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील एकमेव वाहनतळात एका महिन्यात चोरीच्या तीन घटना घडल्या आहेत. येथील चोरीच्या वाढत्या घटनांमुळे पर्यटक हैराण झाले असून, नगरपालिका प्रशासन आणि वन व्यवस्थापन समितीला जाग कधी येणार? असा प्रश्न ते करु लागले आहेत. माथेरान या पर्यटनस्थळाला वरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. माथेरानमध्ये मोटार वाहनांना बंदी आहे. त्यामुळे पर्यटकांना आपली वाहने माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीनाका येथील वाहनतळामध्ये उभी ठेवावी लागतात. त्यासाठी वन व्यवस्थापन समिती व नगरपालिका पर्यटकांकडून प्रत्येक चारचाकी वाहनासाठी 100 रुपये आणि दुचाकी वाहनासाठी 60 रुपये कर वसुल करते. मात्र पर्यटकांनी येथे उभ्या केलेल्या वाहनांची सुरक्षा राम भरोसे असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे चोरीच्या घटनांत वाढ होत आहे. दुचाकी वाहनांमधून पेट्रोल काढले जाते तर काही वाहनांचे आरशे काढले जात आहेत. वन व्यवस्थापन समिती आणि नगरपालिकेचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
–घोडेवाले, रूम एजंट, कुली यांचा वाढता वावर
पर्यटक दस्तुरी येथील वाहनतळात आपले वाहन घेऊन येतात. मात्र वाहनतळात यायच्या अगोदरच घोडेवाले, रूम एजंट, कुली, हातरिक्षावाले हे पर्यटकांच्या वाहना मागे धावत सुटतात. वाहनतळात उतरत नाही, तोच घोडेवाले, रूम एजंट, कुली यांचा गराडा घालतात. जो तो आपल्या धंद्याची जाहिरात करावयास लागतो. त्यांना जाहिरातीसाठी वाहनतळात कोण प्रवेश देतो असा प्रश्न येथील स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.
–पोलीस कारवाईची गरज
घोडेवाले, रूम एजंट, हातरिक्षावाले, कुली हे राजरोसपणे या वाहनतळात वावरत असतात.एका वेळेस फक्त पाच घोडेमालक वाहनतळात येतील. जर जास्त घोडेवाले आढळले तर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बांगर यांनी निर्देश दिले होते. मात्र घोडेवाले आणि रूम एजंट यांच्याकडून पोलिसांना वाटण्याच्या अक्षदा दाखवल्या जात आहेत. या वाहनतळाच्या बाहेर पोलीस चौकी आहे पण रात्रीच्या वेळेस तिथे पोलीस कर्मचारी नसतात.
–वाहनतळातील पथदिवे बंद
सध्ये एमएमआरडीएकडून वाहनतळाचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. त्यामध्ये त्यांनी विजेचे खांब लावून वीज पुरवठा व्यवस्थित सुरू होता. पण काही दिवसांपासून वाहनतळाच्या काही भागातील वीजेचे दिवे बंद आहेत.
–सीसीटीव्ही बसविण्याची मागणी
या वाहनतळामध्ये वन व्यवस्थापन समितीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले होते. पण सुशोभीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर येथील सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकण्यात आले होते, ते कॅमेरे सध्या वन व्यवस्थापन कर कार्यलयातील कपाटात पडून आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वाहनतळात उभ्या असलेल्या वाहनांतून पेट्रोल, आरशे, टायर चोरीस जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्याबाबत वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. वाहनतळातील पथदिवे बंद आहेत ते सुरू करावेत, अशी मागणी नगरपालिकेकडे पत्राद्वारे केली आहे.
-योगेश जाधव, अध्यक्ष, वन व्यवस्थापन समिती, माथेरान