पेण : प्रतिनिधी
विलीनीकरणाच्या मागणीबाबत काही एसटी कर्मचारी ठाम आहेत तर काही ठिकाणी मात्र कर्मचारी कामावर हजर होण्यास सुरुवात झाली आहे. पेणमध्येही अनेक 30 चालक, 30 वाहक कामावर रुजू झाले असुन गुरुवार (दि. 25) सकाळपासूनच पेण – खोपोली, पेण पनवेल, पेण नागोठणे अशा फेर्यांना सुरुवात झाली आहे. यामुळे एक प्रकारे प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
दिवाळीनंतर एसटी संपाला सुरुवात झाल्यांनतर सुट्टीत गावी गेलेल्या प्रवाशांना परतीचा प्रवास खाजगी वाहनांनी करावा लागला, एसटी सेवा बंदचा फटका विद्यार्थी व नोकरदार वर्गाला मोठ्या प्रमाणात बसत होता. यामुळे जास्तीचे भाडे देऊन खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत होता, परंतु हळूहळू रायगड जिल्ह्यातील एसटी सेवेतील पेण बसस्थानकातून पहिली पेण-खोपोली बस सुटल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
या वेळी माहिती देताना रायगडच्या एस. टी. विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी सांगितले की, आतपर्यंत 90 कर्मचार्यांचे निलंबन करण्यात आले असुन सर्व कर्मचार्यांना कामावर रुजू होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याला प्रतिसाद देत काही कर्मचारी पुन्हा कामावर आले असून त्यांच्या माध्यमातुन आम्ही पेण बसस्थानकातून खोपोली, पनवेल, नागोठणे अशा 42 फेर्या सोडण्यात आल्या आहेत. हळूहळू सेवा पूर्ववत होईल अशी आशा आहे.