अनभिज्ञ प्रवासी बसच्या प्रतीक्षेत
अलिबाग : प्रतिनिधी
कोरोनाच्या टाळेबंदीत सहा महिने एसटीची प्रवासी वाहतूक बंद होती. आता कुठे लालपरी सर्व मार्गांवर पूर्ण क्षमतेने धावत होती, तितक्यात पगारवाढीसह इतर मागण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर गेले. परिणामी रायगडात गुरुवारी (दि. 28) प्रवाशांचे हाल झाले. संपाबाबत अनभिज्ञ असलेले प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत उभे असलेले पहायला मिळाले.
वार्षिक वेतनवाढ दोन टक्क्यांवरून तीन टक्के करावी, महागाई भत्ता या प्रमुख मागण्यासह इतर काही मागण्यांसाठी बुधवारपासून एसटी महामंडळाच्या कामगार संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली. बुधवारी रात्रीपासून संप सुरू झाला. मात्र याची कल्पना खेड्यातीलच काय, शहरातील लोकांनाही नव्हती त्यामुळे, गुरुवारी सकाळी नेहमी प्रमाणे दैनंदिन कामावर जाणारा प्रवाशी एसटीच्या प्रतीक्षेत उभा होता. मात्र बर्याच वेळाने एसटी कर्मचार्यांचा संप असल्याची माहिती मिळाली आणि त्याला खाजगी प्रवासी सेवेने कामावर जावे लागले. त्याबरोबर काही प्रवासी लांबच्या प्रवासाकरीता आले होते, त्या प्रवाशांनासुद्धा आपला प्रवास लांबणीवर टाकावा लागला, तर काहींनी आपला मोर्चा खाजगी प्रवासी वाहतूक सेवेकडे वळविला. दरम्यान, माणगाव आगार वगळता जिल्ह्यातील उर्वरित एसटी वाहतूक दिवसभर बंद होती.