नवी दिल्ली : वृत्तसंस्था
मध्यरात्रीनंतर जेव्हा चेन्नई-दिल्ली विमान दिल्लीतील धावपट्टीवर थांबले, तेव्हा सामान काढण्यासाठी किंवा बाहेर जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी झालेली पाहायला मिळाली नाही. त्या वेळी सर्वांच्या नजरा एका जोडप्याकडे वळल्या होत्या. ते होते भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे आई-बाबा. या वेळी प्रवाशांनी उभे राहत टाळ्यांच्या कडडाटात निवृत्त एअर मार्शल एस. वर्धमान आणि डॉ. शोभा वर्धमान यांचे स्वागत केले. वर्धमान आणि त्यांच्या पत्नी जोपर्यंत विमानाबाहेर पडले नाहीत, तोपर्यंत कुणीही प्रवासी जागचा हलला नाही. चेन्नईहून दिल्लीला आलेले वर्धमान दाम्पत्य दिल्लीहून अमृतसरला जात होते. आपला शूर मुलगा विंग कमांडर अभिनंदन यांना आपल्या घरी आणण्यासाठी जात असणार्या या आई-बाबांना अनेक प्रवाशांनी टाळ्या वाजवत, जयघोषासह हस्तांदोलन करीत त्यांचे आभार मानले. दिल्लीत उतरल्यानंतर अभिनंदन यांचे आई-वडील लगेचच अमृतसरला रवाना झाले. पाकिस्तानी लढाऊ विमानांना पळवून लावण्याच्या प्रयत्नात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे विमान कोसळले आणि अभिनंदन पाक लष्कराच्या ताब्यात गेले. अभिनंदन यांना शुक्रवारी भारतात परत पाठवण्यात येईल असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जाहीर केले होते.
‘अभिनंदन खरा सैनिक आहे’ अभिनंदन यांच्या कुटुंबाने दुसर्या महायुद्धापासूनच हवाई दलात आपली सेवा दिली आहे. एअर मार्शल एस. वर्धमान यांचा अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आला आहे. त्यांना परम विशिष्ट सेवा पुरस्कारही मिळाला आहे. ‘अभी जिवंत आहे, तो जायबंदी नाही. तो मानसिकदृष्ट्या अतिशय खंबीर आहे हे त्याच्या बोलण्यावरून लक्षात येते… तो खरा सैनिक आहे… आम्हाला त्याचा अभिमान आहे,’ अशी प्रतिक्रिया अभिनंदन यांचे वडील एअर मार्शल एस. वर्धमान यांनी व्यक्त केली आहे.