Breaking News

मुरूडमधील टपरीधारकांना दिलासा; भाडे माफ कराण्याचे उपविभागीय अधिकार्‍यांचे आदेश

मुरूड : प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या मुरूड समुद्रकिनार्‍यावरील टपरीधारकांचे वार्षिक भाडे नगर परिषदेने माफ करावे, असे आदेश उपविभागीय अधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे या टपरीधारकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे. मुरूड समुद्रकिनारी असलेल्या 44 टपरीधारकांचे निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शासनातर्फे नुकसानग्रस्त टपर्‍यांचे पंचनामे केले गेले. मात्र त्यांना अद्याप कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत मिळालेली नाही. या संदर्भात पद्मदुर्ग व्यावसायिक कल्याणकारी मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी  मुख्यमंत्र्यांसह जिल्हा प्रशासन, तालुका प्रशासन यांच्याकडे अर्ज, विनंत्या करून लक्ष वेधले. मात्र शासनातर्फे काहीही मदत मिळाली नाही. नगर परिषदेने टपरीचे वार्षिक भाडेतरी माफ करावे, अशी मागणी मंडळातर्फे करण्यात आली होती. या संदर्भात नुकतीच मुरूड तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांच्या अध्यक्षतेखाली संबंधीतांची बैठक घेण्यात आली. नायब तहसीलदार रवींद्र सानप, मुख्याधिकारी पंकज भुसे, मंडळाचे अध्यक्ष अरविंद गायकर, दिव्या सतविडकर, दामोदर खारगावकर, महेंद्र पाटील, देवेंद्र सतविडकर, तन्वी भायदे, दीपक जोशी, शकील शाबान, निर्मला सतविडकर आदी या बैठकीला उपस्थित होते.  उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे यांनी या बैठकीत टपरीधारकांच्या समस्या जाणून घेतल्या व या टपरीधारकांचे वार्षिक भाडे नगर परिषदेने ठराव घेऊन शंभर टक्के माफ करावे, असे आदेश दिले.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply