पाली ़: प्रतिनिधी
अवकाळी व परतीच्या पावसाने भात पिकाचे नुकसान केले. तसेच झोडणी व मळणीनंतर शेतात रचलेला पेंढादेखील भिजविला. कुजलेला आणि बुरशी आलेला हा पेंढा जनवारांच्या खाण्यायोग्य राहिला नाही. त्यामुळे मुक्या जनावरांच्या चार्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. सुधागड तालुक्यातील बहुतांश ठिकाणी मागील आठवड्यात अवकाळी व परतीचा पाऊस पडला. काही शेतकर्यांनी भात सुरक्षित ठिकाणी ठेवला असला तरी गुरा-ढोरांच्या चार्यासाठीचा पेंढा/पेंढ्याच्या गंजी मात्र शेतातच ठेवल्या होत्या. अवकाळी पावसाने शेतात आणि मांडवावर ठेवलेला सर्व पेंढा भिजला. तो आता कूजू लागला असून त्यावर काळी बुरशी येऊ लागली आहे. त्यामुळे हा कुजलेला पेंढा गुरा-ढोरांना खाण्यालायक राहिलेला नाही. दुभत्या जनावरांना आणि ढोरांना खायला काहीच राहिले नसल्याने काही दिवसांतच जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अनेक शेतकर्यांना परिस्थितीमुळे पेंढा विकत आणणेदेखील शक्य नाही तसेच सर्वत्रच पाऊस झाल्याने पेंढा उपलब्ध होणे अवघड झाले आहे. शिवाय पेंढ्याच्या किंमतीदेखील वाढू शकतात. त्यामुळे बळीराजा चिंतातूर झाला आहे.
जनावरांसाठी ठेवलेला पेंढा अवकाळी पावसाने भिजून खराब झाला. आता जनावरांच्या चार्याची सोय कशी करायची हाच प्रश्न डोळ्यासमोर आहे. गुरे ढोरे टिकली तरच उदरनिर्वाह चालणार आहे. याबाबत सरकारने काहीतरी नुकसान भरपाई द्यायला पाहिजे.
-हुसेन मोमीन, शेतकरी, पाली, ता. सुधागड