Breaking News

कर्जत उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन इमारती धोकादायक

कर्जत : बातमीदार

येथील उपजिल्हा रुग्णालय परिसरातील तीन  इमारतींना शासनाने धोकादायक ठरवले आहे. त्या इमारती रिकाम्याही करण्यात आल्या आहेत. या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात, असे आदेश असूनदेखील संबंधीत विभाग कोणत्याही प्रकारची कार्यवाही करीत नाही. दरम्यान, त्या धोकादायक इमारती जमीनदोस्त कराव्यात आणि संभाव्य धोका टाळावा अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेने केली आहे.

कर्जत उपजिल्हा रुग्णालय होण्याआधी कर्जत येथे  आरोग्य केंद्र होते. त्यावेळी जुन्या इमारतीमधून कारभार चालत होता. उपजिल्हा रुग्णालयाची नवीन इमारत बांधण्यात आल्यानंतर जुन्या आरोग्य केंद्राच्या इमारतीचा वापर गेल्या काही वर्षात पूर्णपणे बंद झाला होता. त्यामुळे ती इमारत धोकादायक बनली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन वर्षांपूर्वी ही इमारत धोकादायक म्हणून जाहीर केली आहे.

या उपजिल्हा रुग्णालय आवारातील आणखी दोन इमारती कर्जत नगर परिषदने धोकादायक म्हणून जाहीर केल्या आहेत. त्यामुळे या दोन इमारतीमध्ये राहणारे कर्मचारी अन्यत्र भाड्याने राहत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने या दोन्ही इमारती जमीनदोस्त करून तेथे नव्याने मोठी इमारत बांधावी, जेणेकरून  उपजिल्हा रुग्णालयातील सर्व कर्मचारी हे रुग्णालय परिसरात राहू शकतील. मात्र गेली चार वर्षे सार्वजनिक बांधकाम विभाग रुग्णालयाची जुन्या इमारती जमीनदोस्त करीत नाही. त्यामुळे या धोकादायक इमारती कोसळून अपघात होण्याची भीती सम्यक विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. कैलाश मोरे यांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने कामगारांच्या निवासी इमारती आणि रुग्णालयाची जुनी इमारत यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, अशी मागणी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे यांनी केली होती.

कर्जत उपजिल्हा रुग्णालय कामगारांच्या निवासी इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे, असे पत्र शासनाच्या व्हीजेटीआय या संस्थेला दोन वर्षांपुर्वी दिले आहे. त्यांनी ऑडिट केल्यानंतर या इमारती पाडायच्या की दुरुस्त करायच्या? यावर निर्णय घेण्यात येईल.

-अक्षय चौधरी, प्रभारी शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कर्जत

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply