सध्या मुरूड तालुक्यात पर्यटनाचा हंगाम फुलला असून विविध पर्यटनस्थळावर पर्यटकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. वार्षिक परीक्षा संपल्यामुळे पर्यटक आपल्या मुलांसह मुरूड समुद्रकिनारी येण्यास अधिक पसंती देत आहेत. विशेष करून शनिवार व रविवारची सुटी साधून पर्यटक मोठ्या संख्येने मुरूड व काशीद समुद्र किनारी येत आहेत. कोकणाला 720 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला असून मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, पुणे, औरंगाबाद आदी ठिकाणच्या पर्यटकांनी समुद्र किनारा ज्या ठिकाणी आहे या भागाला भेट देण्याचे निश्चित करून हजारोंच्या संख्येने पर्यटकांचे थवे समुद्र किनारी पोहचत आहेत. सध्या कोकणातील तापमान 30 ते 32 अंश सेल्सियस असून समुद्र किनारा असल्याने वारा सतत वाहत राहणारा असल्याने या तापमानाची अल्हाददायकता खूप कमी जाणवत आहे. वार्षिक परीक्षेबरोबरच काही ठिकाणच्या लोकसभा निवडणुका झाल्याने पर्यटक आता गर्दी करत आहेत. कोकणातील निळाक्षार समुद्र व सफेद रंगाची वाळू ही पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असते, तसेच कोकणातील काही तालुके मुंबईपासून जवळ असल्याने या ठिकाणी एक दिवसाची वस्ती करून परत मुंबईला सहज जाता येत असल्याने काही पर्यटक जवळचा मार्ग सुद्धा स्वीकारत असतात.
मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर मुरूड तालुका असल्याने येथे मुंबई, ठाणे, कल्याण व डोंबिवली येथील पर्यटक या ठिकणी येत असून पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे.
ऐतिहासिक सुप्रसिद्ध जंजिरा किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक राजपुरी व खोरा बंदरातून बोटीने जंजिरा किल्ल्यावर पोहचत आहेत. अचानक पर्यटकांचा लोंढा वाढल्याने वाहतूक यंत्रणेवर मोठा ताण पडून रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनेच वाहने पाहावयास मिळत आहेत. राजपुरी जेट्टी येथे वाहनांची पार्किंग व्यवस्था आहे, परंतु येथेसुद्धा वाहनांची तुडुंब गर्दी झाल्याने समुद्र किनारी मोकळ्या जागेतसुद्धा वाहनांची गर्दी होती. खोरा बंदरात तर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने लावण्यात आली होती. पर्यटकांचे थवे जंजिरा किल्ल्यावर मोठ्या संख्येने पाहावयास मिळत आहेत.
जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मुंबई, ठाणे, डोंबिवली, पालघर, औरंगाबाद, नाशिक, धुळे आदी भागातून प्रचंड प्रमाणात हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक येत आहेत. जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी जंजिरा पर्यटक सोसायटीच्या 13 शिडांच्या बोटी, वेलकम सोसायटीची इंजिन बोट, तर खोरा बंदरातून सुटणार्या बोटींची व्यवस्था उपलब्ध होती, परंतु पर्यटक मोठ्या संख्येने आल्यामुळे खूप काळजीपूर्वक बोटींची वाहतूक सुरू होती. राजपुरी जेट्टी येथे बोटीचे तिकीट घेण्यासाठी मोठी गर्दी दिसून येत आहे. पर्यटकांना उन्हाचा देखील सामना करावा लागत आहे. सुप्रसिद्ध जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी राजपुरी, खोरा बंदर व दिघी येथूनसुद्धा असंख्य पर्यटक आल्याने येथे गर्दी पाहावयास मिळत आहे. मुरूड शहरातील सर्व हॉटेल व लॉजिंग व्यवसाय तेजीत आहे. मुरूडप्रमाणे काशीद येथे सुद्धा पर्यटक आले आहेत. काशीद समुद्रकिनारी सुद्धा मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. सध्या एप्रिल महिना सुरू असून मुरूड समुद्र किनारा पर्यटकांनी फुलला आहे. अनेक देशी-विदेशी पर्यटकांनी येथे प्रचंड गर्दी केली आहे. घोडेस्वारी, बनाना ट्रिप, उंट स्वारी करून पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. जंजिरा किल्ल्यावर अशा गर्दीच्या वेळी जादा बोटी सोडण्यात आलेल्या आहेत. जंजिरा जलवाहतूक सोसायटीच्या 13 शिडांच्या बोटी आहेत, तर वेलकम सोसायटीच्या बोटीद्वारे पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर सुरक्षित सोडण्यात येत होते.
याबाबत अधिक माहिती देताना जंजिरा जलवाहतुकीचे व्यवस्थापक नाझ कादरी यांनी आमच्या प्रतिनिधीस सांगितले की, एप्रिल महिन्यात परीक्षा संपल्याने पर्यटक जंजिरा किल्ला पाहावयास येत आहेत. यासाठी आमच्याकडील 13 शिडांच्या होड्यांव्यतिरिक्त आणखीन होड्या पर्यटकांच्या सेवेसाठी तैनात करतो. त्यामुळे कोणत्याही पर्यटकांचा वेळ वाया जात नाही, तसेच जंजिरा किल्ल्यावर उतरताना प्रशिक्षित काही खास व्यक्ती नियुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून पर्यटकांची विशेष काळजी घेण्यात येत आहे.
तर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे येथील बंदर निरीक्षक अशोक बारापत्रे यांनी सांगितले की, पर्यटकांची जंजिरा किल्ला पाहण्यासाठी खूप मोठी गर्दी होत आहे. अशा वेळी राजपुरी येथील जुनी व नवीन जेट्टी बरोबरच आम्ही खोरा बंदर जेट्टीचाही विकास केला असून येथून सुद्धा पर्यटकांना जाण्या येण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. खोरा बंदर येथे पर्यटकांच्या गाड्या जास्तीत जास्त राहाव्या यासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध झाला असून येथील विकासाचे काम सुरू असल्याची माहिती या वेळी त्यांनी दिली. पर्यटक जंजिरा किल्ला व समुद्र याचा तर आनंद घेत असून मुरूड तालुक्यातील फणसाड अभयारण्य पाहण्यासाठी सुद्धा गर्दी पाहावयास मिळत आहे फणसाड अभयारण्यात वन्य प्राण्यांमध्ये बिबट्या, रानमांजर, सांबर, वानर, भेकर, रानडुक्कर, साळींदर, पिसोरी व मोठी खार अर्थात शेकरू, बिबटे आदींचा समावेश आढळतो, तर सरपटणार्या प्राण्यांमध्ये नाग, अजगर, मण्यार, फुरसे, घोणस, हरणटोळ, धामण आदी सर्पांच्या जाती आढळतात. या जंगलात मोठ्या प्रमाणात ऐन, साग, किंजळ, सावर, कुंभी, भोकर, पांगारा, पायर, करंज, हेद, काजू, डंबर, खवस, कोकम, जारूळ, मोहा, कळंब, अर्जुन आदी वनसंपदा आहे. बारमाही नैसर्गिक झरे ग्रामीण बोलीत त्याला ‘गाण’ संबोधतात. अशा सुमारे 27 गाणी आहेत. या सर्व वैशिष्ठ्यांबरोबरच आता फणसाड अभयारण्यात रान गवेसुद्धा आढळून आलेले आहेत. हे अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटक स्वतःची चारचाकी गाडी घेऊन येताना दिसत आहेत. येथील वन्यजीव व विविध औषधी वनस्पती पाहण्याकडे यांचा कल दिसून येत आहे. पर्यटकांची संख्या वाढल्याने फणसाड अभयारण्याच्या तिकिटांद्वारे मिळणार्या महसुलात वाढ झाल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले. या ठिकाणी पर्यटकांना राहण्यासाठी टेन्ट, तसेच व्हाईट हाऊसची सुविधा असून भोजनासाठी बचत गटाद्वारे पर्यटकांना भोजन व्यवस्था करण्यात आली असून पर्यटकांना या अभयारण्यातील पक्षी व वन्यजीव पाहता यावे यासाठी दुर्बिणसुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती फणसाड अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे. एकंदर मुरूडमधील सर्वच पर्यटनस्थळावर पर्यटकांची संख्या पाहावयास मिळत आहे.
-संजय करडे, खबरबात