Breaking News

राजिपची ’शिवतीर्थ’ धोकादायक

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाची इमारत ‘शिवतीर्थ’ धोकादायक असल्याचा अहवाल लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे स्ट्रक्चरल अभियंता डॉ. सचिन पोरे यांनी दिला आहे. त्यामुळे ही इमारत आता पाडावी लागणार आहे. ‘शिवतीर्थ’ इमारतीचे बांधकाम 1978मध्ये सुरू करण्यात आले. 1982 साली ही इमारत बांधून पूर्ण झाली. गेली 42 वर्षे या इमारतीतून जिल्ह्याचे कामकाज सुरू आहे.

या इमारतींने अनेक सत्तांतरे पाहिली. अधिकारी, पदाधिकारी पाहिले. या प्रदीर्घ कालावधीत इमारतीच्या अंतर्गत दालनात वारंवार बदल झाले. सत्ता बदलली की दालनाचे नूतनीकरण, अधिकार्यांच्या दालनातचे नूतनीकरण होत असते. आतापर्यंत नूतनीकरणावर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. या पैशातून नवीन इमारत उभी राहिली असती. विशेष म्हणजे वारंवार नूतनीकरण होऊनही इमारतीमधील काही दालनात धोकादायक परिस्थिती पहायला मिळते.

या पार्श्वभूमीवर इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतरिम अहवाल 11 नोव्हेंबर 2021 रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांना प्राप्त झाला आहे. या अहवालात जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत जुनी झाली असून शासकीय काम करण्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. 17 नोव्हेंबर 2021 रोजी झालेल्या जि. प.च्या सर्वसाधारण सभेत सीईओ डॉ. पाटील यांनी ‘शिवतीर्थ’ पाडावी लागणार असल्याची माहिती दिली होती.

दरम्यान, इमारतीच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अंतरिम अहवाल आल्यामुळे या इमारतीत कोणतेही बांधकाम करू नये. कोणत्याही विभागाचे किंवा पदाधिकारी यांच्या दालनाचे नूतनीकरण किंवा सुशोभीकरण करू नये, अशा सूचना डॉ. पाटील यांनी बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना दिल्या आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply