Breaking News

पंतप्रधानांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

डबल इंजिन सरकार वेगाने काम करतेय -नरेंद्र मोदी

नागपूर ः प्रतिनिधी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात 75 हजार कोटींच्या विकासकामांसाठी महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेचे अभिनंदन. आजच्या या विकासकामांमधून डबल इंजिन सरकार महाराष्ट्रात वेगाने काम करीत असल्याचे दर्शवित आहे. समृद्धी महामार्गामुळे नागपूर आणि मुंबईतील अंतर कमी होईलच, पण हा महामार्ग 24 जिल्ह्यांना जोडत आहे. यामुळे शेतकरी, उद्योग, भाविकांना मोठा फायदा होईल. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 11) येथे केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कोनशिलेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. महामार्गाच्या नागपूर येथील झिरो पॉईंटपासून दहा किमी अंतरावर असलेल्या टोल प्लाझा येथे अनावरणाचा हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. आज महाराष्ट्राच्या विकासासाठी 11 तारका उदयाला येत आहेत. हे महानक्षत्र महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा, ऊर्जा देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या सोहळ्यास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित होते. पायाभूत सुविधांना एक मानवी स्पर्श देणारे सरकार सध्या देशात आहे. प्रत्येक गरीबाला पाच लाखांपर्यंत मोफत उपचार देणार आयुषमान भारत योजना सामाजिक पायाभूत सुविधेचे उदाहरण आहे. उज्जैनपासून ते पंढरपूर्यंत आपल्या प्रार्थनास्थळांचा विकास आपल्या सांस्कृतिक पायाभूत सुविधांचे उदाहरण आहे. 45 कोटींपेक्षा जास्त गरिबांना बँकिंग प्रणालीशी जोडणारी जनधन योजना आपल्या आर्थिक पायाभूत सुविधेचे उदाहरण आहे, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पायाभूत सुविधांना फक्त निर्जीव रस्ते आणि फ्लायओव्हरपुरते मर्यादित ठेवू शकत नाही. याचा विस्तार फार मोठा आहे, असेही ते म्हणाले. पंतप्रधान मोदींनी या वेळी गोसेखूर्द प्रकल्पाचे उदाहरण दिले. 30-35 वर्षांपूर्वी या धरणाचे भूमिपूजन करण्यात आले. त्या वेळी 400 कोटींचा खर्च अपेक्षित होता, पण विलंबामुळे गोसेखूर्द प्रकल्पाचा अंदाजे खर्च 400 कोटींहून 18 हजार कोटींवर गेला. डबल इंजिन सरकार आल्यानंतर या धरणाचे काम वेगाने सुरू आहे. सर्व समस्या सोडविण्यात आल्या आहेत. या वर्षी हे धरण पूर्ण भरले याचा आनंद आहे. यासाठी तीन दशकांहून अधिकचा काळ लागला. त्यानंतर शेतकरी, गावांना याचा लाभ मिळत आहे, असे ते म्हणाले. आम्ही ‘सबका साथ, सबका विश्वास, सबका विकास, सबका प्रयास’ यावर जोर देत आहोत. मी जेव्हा सबका प्रयास म्हणतो तेव्हा त्यात प्रत्येक नागरिक आणि राज्य सहभागी आहे. छोटे, मोठे सर्वांचे सामर्थ्य वाढेल  तेव्हाच भारताचा विकास होईल. यामुळे वंचित राहिलेल्यांना, ज्यांना छोटे समजण्यात आले त्यांना आम्ही प्रोत्साहन देत आहोत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. मी महाराष्ट्र, देशातील लोकांना देशातील राजकारणात येत असलेल्या एका विकृतीपासून सावधान करू इच्छित आहे. शॉर्टकटच्या राजकारणाची ही विकृती आहे. राजकीय स्वार्थासाठी देशाचा पैसा लुटणारी विकृती आहे. करदात्यांची कमाई लुटणारी ही विकृती आहे. शॉर्ट कट घेणारे हे राजकीय पक्ष, नेते देशातील प्रत्येक करदात्याचे सर्वांत मोठे शत्रू आहेत. सत्तेत येणे हाच यांचा हेतू असतो. खोटी आश्वासने देऊन सरकार हिसकावून घेण्याचा हेतू असणारे कधीही देशाचे निर्माण करू शकत नाहीत, अशी टीका पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर केली.पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की भारत पुढील 25 वर्षांचे धोरण समोर ठेवून काम करीत असताना काही पक्ष आपल्या स्वार्थासाठी भारतीय अर्थव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहेत. देशात पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा आपण त्याचा फायदा घेऊ शकलो नाही. दुसर्‍या आणि तिसर्‍या वेळीही आपण मागे होतो, पण आज देशात चौथी औद्योगिक क्रांतीची वेळ आली आहे, तेव्हा भारत ती संधी गमावू शकत नाही. अशी संधी देशाला वारंवार मिळत नाही. शॉर्टकटने कोणताही देश चालू शकत नाही. देशाच्या प्रगतीसाठी स्थायी विकास, दूरचा विचार गरजेचा आहे. पंतप्रधान मोदींनी या वेळी दक्षिण कोरिया आणि सिंगापूरचे उदाहरण दिले. या देशांमध्येही करदात्यांचे पैसे लुटले असते तर हे देश आहेत त्या उंचीवर पोहचू शकले नसते, असे त्यांनी सांगितले. भारताकडे उशिरा का होईना ही संधी आली आहे, असेही ते म्हणाले.

आज मी स्वत:ला भाग्यशाली समजतो. आमच्याच कारकिर्दीत या महामार्गाचे लोकार्पण होत आहे. यात खूप अडचणी आल्या. जमीन अधिग्रहणाला खूप विरोध झाला. लोकांना विरोध करायला लावला. हा प्रकल्प होऊ नये, जमिनी दिल्या जाऊ नयेत म्हणून बैठका झाल्या, पण मी आणि देवेंद्र फडणवीसांनी कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन काम केले. शिर्डी ते मुंबई या दुसर्‍या टप्प्याचेही लोकार्पण पुढच्या वर्षभरात होणार आहे.

-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

आमची मनापासून खूप इच्छा होती की, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हावे. 20 वर्षांपूर्वी हे स्वप्न पाहिले होते, पण मोदीजी नसते तर हे केवळ स्वप्नच राहिले असते आणि कधीच पूर्ण झाले नसते. मोदींनीजी ताकद दिली, हिंमत दिली आणि जबाबदारी दिली. त्यामुळेच आम्ही हा समृद्धी महामार्ग करू शकलो.

-देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

Check Also

पनवेलच्या शिवकरमध्ये विकासाचे महापर्व; दोन कोटी 82 लाख रुपयांची विविध कामे

आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल ः रामप्रहर वृत्तशिवकर ग्रामपंचायतीमध्ये …

Leave a Reply