राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना मृतांच्या संख्येतही त्या प्रमाणात वाढ झाल्याचे आता समोर येत आहे. गेले सलग सात आठवडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असूनही राज्य सरकारकडून त्यासंदर्भात काहीही विशेष उपाययोजना करण्यात आलेली नाही. आजवर हा फैलाव प्रामुख्याने मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांपुरता मर्यादित राहिला असला तरी याच काळात राज्यात पंढरपूरची वारी होणार असल्याने सगळ्यांनीच निश्चितच आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येने पाच हजाराचा आकडा ओलांडला आहे. मुंबईत ही संख्या दोन हजाराच्या वर गेली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येच्या वाढत्या आलेखासोबतच काही अंशी मृत्यूचे प्रमाणही वाढत असल्याचे दिसून येते आहे. दिनांक 30 मे ते 5 जून या काळात राज्यातील कोरोना मृतांची संख्या सात इतकी होती तर त्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत दिनांक 13 ते 19 जून या काळात मृतांची संख्या 16 वर पोहोचल्याचे दिसून आले. म्हणजेच मृतांची संख्या दुप्पटीहून अधिक झाली. एकंदर गेल्या तीन आठवड्यांत कोरोनाचे संकट पुन्हा तीव्र होत चालल्याचे स्पष्टपणे दिसत असूनही अद्यापही राज्य सरकारने त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने काहीही हालचाल केलेली दिसत नाही. राज्यात गेल्या आठवडाभरात जो काही राजकीय पेच उद्भवला आहे, त्यानंतर तर राज्यात सरकार आहे वा नाही अशीच परिस्थिती निर्माण झाली असून जनतेच्या सर्वच प्रश्नांकडे संपूर्ण दुर्लक्ष सुरू आहे. राज्यात जूनच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोनाचा फैलाव पुन्हा डोकेवर काढताना दिसू लागला. सर्वसाधारणपणे ओमायक्रॉनच्या चार उपप्रकारांचा फैलाव राज्यात दिसत असून यापासून होणारा संसर्ग सौम्य असल्याचे सध्या तरी दिसत आहे. परंतु सातत्याने संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता संपूर्ण गाफिलपणा निश्चितच धोकेदायक ठरू शकेल. गेल्या आठवड्यात राज्यात नोंदल्या गेलेल्या 16 कोरोना मृत्यूंपैकी 10 मृत्यू मुंबईत नोंदले गेले होते तर उर्वरित मृत्यूंपैकी दोन रायगड जिल्ह्यात आणि ठाणे, वसई-विरार, जळगाव आणि सातारा येथे प्रत्येकी एका मृत्यूची नोंद झाली होती. मुलांमधील कोरोनासंसर्गातही दीर्घकाळ त्रास होतो हेही आता संशोधनातून दिसून आले आहे. यापूर्वी प्रौढांमध्ये हे दिसून आले होते. परंतु आता जसजशी संशोधनातून अधिक माहिती हाती येऊ लागली आहे, तसतसे मुलांमध्येही कोरोनाचा त्रास दीर्घ काळ जाणवू शकतो हे स्पष्ट होऊ लागले आहे. मुलांसाठीच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची आपल्याकडे नीट अंमलबजावणीच झालेली नाही. मुंबईत पालिका शाळांकडील माहितीनुसार 12 ते 15 या वयोगटातील निव्वळ 47 टक्के मुलांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे तर निव्वळ 20 टक्के मुलांनी दुसरी मात्रा घेतली आहे. लसीकरणाची मोहीम एकूणात थंडावली असल्यामुळे स्वाभाविकच मुलांच्या लसीकरणावरही त्याचा परिणाम दिसतो आहे. प्रौढांसाठीच्या बूस्टर डोसबद्दलही जनतेमध्ये गैरसमज पसरले असून हा डोस विशिष्ट काळातच घेणे का आवश्यक आहे हे जनतेपर्यंत पोहोचवण्याची नितांत गरज आहे. सध्याच्या कोरोना फैलावात सौम्य लक्षणे दिसून येत असल्यामुळे जनतेमध्ये बूस्टर डोस घेण्याबाबत तसेच मुलांना लस देण्याबाबत कमालीची उदासीनता दिसून येत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आपल्या खुर्च्या वाचवण्यात मश्गुल असताना जनतेने स्वत:च स्वत:ची काळजी घेण्याला तूर्तास तरी दुसरा पर्याय दिसत नाही.