Breaking News

ऊर्जामंत्री राऊतांनी राजीनामा द्यावा

भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांची मागणी

मुंबई ः प्रतिनिधी
राज्याच्या ऊर्जामंत्र्यांचे चिरंजीव कुणाल हे लढवत असलेल्या प्रदेश युवक काँग्रेसच्या पदाधिकारी निवडणुकीसाठी महावितरणची यंत्रणा वापरली जात असल्याचे सिद्ध झाल्याने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 7) पत्रकार परिषदेत केली. भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेस माजी मंत्री व विद्यमान आमदार आशीष शेलार, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये उपस्थित होते.
या वेळी विक्रांत पाटील यांनी नवी मुंबईत वाशी येथे सोमवार 6 डिसेंबर रोजी महावितरणचे अधिकारी एका बैठकीत महावितरणच्या कर्मचार्‍यांना, तसेच कंत्राटदारांना या निवडणुकीसाठी सदस्य नोंदणी कशी करावी याचे मार्गदर्शन करीत असतानाची ध्वनिचित्रफीत सादर केली. या कामात मदत करण्यासाठी ‘वरून दबाव’ आहे, तसेच या कामात मदत केल्यास कंत्राटदारांना योग्य बक्षीस मिळेल, मदत न केल्यास त्याचेही ‘फळ’ मिळेल अशा भाषेत महावितरणचे अधिकारी या बैठकीत बोलत असल्याचे दिसून येते. या बैठकीच्या ठिकाणी विक्रांत पाटील, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता घंगाळे, प्रशांत कदम आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला व संबंधित अधिकार्‍यांना जाबही विचारला. या वेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना एका अधिकार्‍याची महावितरणची डायरी व्यासपीठावर मिळाली.
या डायरीत ऊर्जामंत्र्यांच्या चिरंजीवांना निवडणुकीत कसे साह्य करावयाचे आहे याची टिपणे आढळून आली आहेत. संबंधित अधिकार्‍याविरुद्ध महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रार करण्यात आल्याचे पाटील यांनी नमूद केले.
पाटील यांनी सांगितले की, वाशी येथील घटनेतून महावितरणची यंत्रणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या चिरंजीवांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या दावणीला बांधली असल्याचे सिद्ध झाले आहे. या प्रकाराची जबाबदारी स्वीकारून नितीन राऊत यांनी ऊर्जामंत्रीपदाचा तातडीने राजीनामा द्यावा; अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चा राज्यभर आंदोलन करेल, असा इशाराही पाटील यांनी या वेळी दिला.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply