Breaking News

अवकाळी पावसामुळे पांढर्या कांद्याची पुनर्लागवड करण्याची वेळ

अलिबाग : प्रतिनिधी

अवकाळी पावसामुळे अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकर्‍यांना पांढर्‍या कांद्याची पुनर्लागवड करावी लागली आहे. त्यामुळे यंदा पांढरा कांदा बाजरात उशिरा येईल.

अलिबाग तालुक्यातील कार्ले, सागाव, खंडाळा, वाडगाव या परिसरात पांढर्‍या कांद्याची लागवड केली जाते. अलिबाग तालुक्यात पांढर्‍या कांद्याचे 250 ते 300 हेक्टर पीक क्षेत्र आहे. गेल्या वर्षी 270 हेक्टवर हे पीक घेण्यात आले. डिसेंबर महिन्यात पडलेल्या अवेळी पावसाचा पांढर्‍या कांद्याच्या लागवडीला मोठा फटका बसला असून, शेतकरी संकटात आहे. अवकाळी पावसामुळे अलिबाग तालुक्यातील पांढरा कांदा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकर्‍यांनी पांढरा कांदा पिकाची गादी वाफ्यावर पेरणी केली आहे त्यांना नुकसानीचा सामना करावा लागणार नाही मात्र पाणी साचणार्‍या भागातील लागवडीमुळे कांदा पिकाचे नुकसान होऊ शकते. शेतकर्‍यांना पुनर्लागवड करावी लागल्यामुळे कांद्याचे उत्पादन उशिरा होईल. त्यामुळे कांदा बाजारात उशिरा येईल.

कार्ले परिसरातील प्रगतशील शेतकरी सतिश म्हात्रे यांनी सुमारे अडीच एकर शेतजमिनीत पांढर्‍या कांद्याची लागवड केली असून अवेळी पडलेल्या पावसामुळे लागवडीला मोठा फटका बसला आहे. गेले 15 दिवस लागवडीचे काम सुरू आहे, मात्र अवेळी पाऊस, ढगाळ वातावरण व निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होत आहे. रोहा कृषी विज्ञान केंद्राचे कृषी शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी नुकतीच कार्ले परिसरात शेतावर जाऊन पाहणी करून शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले व उपाययोजनांची माहिती दिली.

अशी होते कांदा लागवड

लागवड केलेली कांदा रोपे व रोपवाटिकेच्या वाफ्यातील पाणी चराद्वारे काढून पाण्याचा निचरा करणे, नवीन कांद्याची लागवड ही गादी वाफा किंवा सरी वरंब्यावर करावी, लागवड करते वेळी सेंद्रीय खत, शेणखत, गांडूळखत यापैकी एक प्रति चौरस मीटरला एक किलो ट्रायकोडर्मा पावडर 10 ग्रॅम किंवा निंबोळी पावडर प्रति चौरस मीटरला 50 ग्रॅम याप्रमाणे मातीत मिसळून गादी वाफे किंवा सरी वरंबा तयार करावे, रोपांची पुनर्लागवड करते वेळी रोपाची मुळे ट्रायकोडर्मा पावडर 25 ग्रॅम प्रतीलिटर पाणी किंवा कार्बनडेन्झिम 2 ग्रॅम इमिडाक्लोरोपीड 1 मिलिलीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 5 मिलिलीटर प्रतीलिटर पाणी याप्रमाणे द्रावण तयार करून रोपाची मुळे 10 ते 15 मिनिटे रोपे बुडवून नंतर रोपाची लागवड करावी, लागवडीनंतर 10 दिवसांनी झॉक्सिस्ट्रोबीन 11%+टेब्यूकोनाझोल 18.3% (टोझीक/मिस्टार) 10 मिलिलीटर+क्विनॉल फॉस 15 मिलीलीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 15 मिलीलीटर याप्रमाणे 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, लागवडीनंतर 15 दिवसांनी झॉक्सिस्ट्रोबीन 11%+टेब्यूकोनाझोल 18 3% (टोझिक/मिस्टार) 10 मिलीलीटर+क्विनॉल फॉस 15 मिलीलीटर किंवा क्लोरोपायरीफॉस 15 मिलीलीटर याप्रमाणे 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, लागवड केलेल्या कांद्याच्या रोपाची मर होत असेल, तर सिलीकॉन+स्टीकर किंवा सूक्ष्म अन्नघटक म्हणून चिलेटेड झिंक 2 ग्रॅम/2 मिलिलीटर प्रतीलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, कांदा रोपाची मर होत असेल तर मेटालेक्सिल 8%+मेन्कोजेब 64% (बुलेट) रेडोमिलगोल्ड किंवा हेक्झाकोनाझोल (कोन्टोप) 3 ग्रॅम प्रतीलिटर पाण्यात मिसळून ड्रिचिंग करणे (वाफ्यात सोडणे), असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकर्‍यांनी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार बदलते हवामान व अवकाळी पडणारा पाऊस यापासून संरक्षण होण्यासाठी कांदा पिकाचे व्यवस्थापन करावे.

-उज्ज्वला बाणखेले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रायगड

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply