Breaking News

तामिळनाडूत भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना; देशाचे सीडीएस बिपीन रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू

चेन्नई, नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशाच्या तिन्ही सैन्यदलांचे प्रमुख अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत यांचे बुधवारी (दि. 8) तामिळनाडूमध्ये झालेल्या भीषण हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये निधन झाले. भारतीय वायुदलाचे एमआय-17 व्ही 5 हेलिकॉप्टर बुधवारी दुपारी तामिळनाडूच्या कुन्नूर भागात कोसळले. या दुर्घटनेत एकूण 14 पैकी 13 जणांचा मृत्यू झाला आहे. सीडीएस रावत आणि इतर लष्करी अधिकारी, कर्मचार्‍यांच्या निधनाबद्दल देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे निलगिरीच्या डोंगराळ प्रदेशामध्ये भारतीय हवाई दलाचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये एकूण 14 जण प्रवास करीत होते. यामध्ये सीडीएस जनरल बिपीन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत, ब्रिगेडियर एल. एस. लिडेर, लेफ्टनेंट कर्नल हरजिंदर सिंह, नायक गुरसेवक सिंह, जितेंद्र कुमार, लान्स नायक विवेक कुमार, बी. तेजा, ग्रुप कॅप्टन वरुण सिंह, हवालदार सतपाल आदींचा समावेश होता. अपघातात सर्व जण गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारांदरम्यान रावत दाम्पत्यासह 13 जणांचा मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह जखमी असून त्यांच्यावर वेलिंग्टन येथील लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती भारतीय वायुदलाकडून देण्यात आली.

यापूर्वी बचावले होते रावत
देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला यापूर्वीही दुर्घटना घडली होती. 3 फेब्रुवारी 2015 रोजी रावत यांचे हेलिकॉप्टर नागालँडच्या दिमापूर जिल्ह्यातील हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर 20 फूट उंचीवर कोसळले होते. या वेळी ते व सोबत असलेले जवान बचावले होते.
प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. या दुर्घटनेनंतर तेथील स्थानिकांनी सर्वांत प्रथम बचावकार्यासाठी धाव घेतली होती. या घटनेचे साक्षीदार असणारे कृष्णस्वामी यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
कृष्णस्वामी म्हणाले, मी सर्वांत प्रथम खूप मोठा आवाज ऐकला. काय झाले आहे हे पाहण्यासाठी बाहेर आलो तर हेलिकॉप्टर झाडावर आदळत असल्याचे पाहिले. यानंतर आग लागली आणि ते अजून एका झाडावर आदळले. या वेळी दोन ते तीन लोक हेलिकॉप्टरमधून बाहेर येताना दिसले. ते पूर्णपणे भाजले होते आणि खाली जमिनीवर कोसळले. मी तत्काळ तिथे जवळ राहणार्‍यांना मदतीसाठी आवाज दिला. त्यानंतर अग्निशमन दल आणि आपातकालीन सेवांना कळविण्यात आले.

जनरल बिपीन रावत हे उत्कृष्ट सैनिक, खरे देशभक्त होते. देशाच्या सैन्य दलांचे आणि सुरक्षा व्यवस्था आधुनिकीकरण करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. रणनीतीवर त्यांची दूरदृष्टी आणि दृष्टिकोन हा अपवादात्मक होता. त्यामुळे त्यांचे आपल्यातून जाणे हे माझ्यासाठी अतिव दुःखदायक आहे. ओम शांती!
-नरेंद्र मोदी, पंतप्रधान

तामिळनाडूमध्ये आज झालेल्या एका अत्यंत दुर्दैवी हेलिकॉप्टर अपघातात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि सशस्त्र दलाच्या 11 जवानांच्या आकस्मिक निधनामुळे खूप दुःख झाले. त्यांचे अकाली निधन हे आपल्या सशस्त्र दलांचे आणि देशाचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे.
-राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री

 

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply