Breaking News

पोपटी कविसंमेलन व्यासपीठ -प्रा. बागवे

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल परिसरातील पोपटी कविसंमेलन साहित्यिक, नवोदित कवींना व्यासपीठ देण्याचे आणि संस्कृती टिकविण्याचे काम करीत आहे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी प्रा. अशोक बागवे यांनी नवीन पनवेल येथे केले. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवीन पनवेल शाखेतर्फे आयोजित पोपटी कविसंमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. बागवे बोलत होते. या पोपटी कविसंमेलनास पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, सुप्रसिद्ध कवी साहेबराव ठाणगे, अभिनेते संतोष पवार, भारत सावळे, कवी एल. बी. पाटील, कोपसापचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर चव्हाण, नवीन पनवेल अध्यक्ष गणेश कोळी, शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार रमेश गुडेकर, ‘महाराष्ट्र दिनमान’चे संपादक शैलेश शिर्के तसेच विनोद साळवी, ‘हायरीच’चे धर्मेश धनेशा, आदम ढालाईत आदी उपस्थित होते. या वेळी प्रा. बागवे यांनी या पोपटी कविसंमेलनाचे कौतुक केले. ही वेगळी संकल्पना असली तरी त्याचे महत्त्व दिवसेंदिवस वाढतच आहे. यातून या मातीतले साहित्यिक, कवी घडतील आणि हे कविसंमेलन राज्यभर पोहचेल, अशा शब्दांत प्रा. बागवे यांनी शुभेच्छा दिल्या. पोपटी कवी संमेलनाला उपस्थिती लावलेल्या आयुक्त गणेश देशमुख यांना कवींच्या कविता ऐकल्यानंतर त्यांच्या आठवणीतील कविता सादर करण्याचा मोह आवरला नाही. मराठी भाषा टिकविण्यासाठी प्रत्येक बोलीभाषेतील अशा प्रकारची कविसंमेलने व्हायला हवीत, असे मत त्यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी इंग्रजी माध्यमात मुलांना प्रवेश घेण्याकडे सर्वांचा कल वाढला आहे, मात्र आपली संस्कृती टिकेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा वेळी बोलीभाषेत होणारी पोपटी कविसंमेलने ती भाषा जिवंत राहण्यास उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.  प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिध्द लेखक, दिग्दर्शक, अभिनेते संतोष पवार यांनीदेखील पोपटी कविसंमेलनाचे कौतुक केले. कविता हे प्रचंड ताकदीचे माध्यम असून, पोपटी कविसंमेलनाबद्दल मी अनेक वेळा ऐकले होते, परंतु पहिल्यांदा याचा आस्वाद घेता आला. या आगळ्यावेगळ्या कविसंमेलनात कविता ऐकून मन तृप्त झाले. शिवाय स्थानिक बाज असलेले पदार्थ खाऊन पोटदेखील तृप्त झाले, अशा मार्मिक शब्दांत त्यांनी आपला अनुभव सर्वांसमोर मांडला. प्रास्ताविक गणेश कोळी यांनी, तर सूत्रसंचालन श्रीनिवास काजळेकर व जनार्दन सताणे यांनी केले. वालाच्या शेंगा, वांगी, बटाटे, लसूण अशा भाज्यांपासून बनविण्यात येणार्‍या पोपटीला अग्नी देऊन कविता सादरीकरणाला सुरुवात झाली. स्थानिक आगरी भाषेतील कवितांचा प्रभाव असलेल्या पोपटी कविसंमेलनात उपस्थित कवींनी एकापेक्षा एक कविता सादर केल्या. एकीकडे पोपटीची धग वाढत असताना कवींच्या कवितांनी कार्यक्रमाची रंगत वाढवी. या वेळी वास्तववादी विषयांवर सादर झालेल्या कवितांना रसिकांनी दाद दिली.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply