नागपूर ः प्रतिनिधी
नागपूर जिल्ह्यातील मौद्यातील मारोडी येथे सामूहिक बलात्कार पीडित तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणातील नराधमांना कठोर शिक्षा देण्याची मागणी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी केली आहे. घटनेनंतर निर्माण झालेला तणाव पाहता पोलिसांनी आरोपींच्या घराबाहेरही कडक बंदोबस्त ठेवला आहे. मारोडीतील बलात्कार पीडित तरुणीचे मयूर नामक तरुणाशी प्रेमसंबंध होते. श्याम हा मयूरचा मित्र असल्याने ती श्यामला ओळखत होती. शुक्रवारी रात्री श्यामने तिला मारोडी बसस्थानकाजवळ भेटायला बोलावले. श्यामने तिला एका निर्जनस्थळी नेले. तिथे मयूर, राहुल आणि अल्पवयीन आरोपी हे तिघे आधीपासूनच थांबले होते. त्यांनी पीडित मुलीला बळजबरीने दारू पाजून तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. नराधम तिला दुचाकीवरून घेऊन जाताना तरुणीने प्रतिकार केल्याने नराधमांनी पीडितेला पुलावर सोडून पळ काढला. घरी परतल्यावर पीडितेने आई व भावास घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले व नराधमांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटकही केली. दरम्यान, रविवारी दुपारी पीडित मुलीने घरात एकटी असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने सुसाइड नोटही लिहून ठेवली होती.