पनवेल : प्रतिनिधी
साथरोगाबाबतची माहिती उपलब्ध होण्यासाठी पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील जनरल प्रॅक्टिशनर आणि पॅथॉलॉजी लॅबची माहिती महापालिकेकडे असणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर जनरल प्रॅक्टिशनर आणि पॅथलॉजी लॅब असोशिएशनच्या प्रतिनिधींची बैठक डॉ. अरुणकुमार भगत, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या उपस्थितीत महापौर दालनात घेण्यात आली. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कार्यरत असलेल्या खाजगी रुग्णालय, एमटीपी सेंटर, सोनोग्राफी सेंटर सोबतच पॅथॉलॉजी लॅब, क्लिनिक, दवाखाना, डे-केअर युनिट, हेल्थ केअर युनिट यांची नोंदणी महापालिकेकडे नसल्याने डेंग्यु, गॅस्ट्रो, मलेरिया यासारख्या साथरोगाविषयीची माहिती मिळण्यास अडचण येते. त्यांची नोंदणी नसल्याकारणाने विविध खाजगी लॅबचे रिपोर्ट पालिकेकडे येत नाही, तसेच आजारांचा साथरोगाबाबतचा रिअल टाईम डाटा पालिकेकडे उपलब्ध होऊ शकत नाही. शासनाच्या विविध आरोग्य उपक्रमांची माहिती व अंमलबजावणी करण्याकरिताही ही नोंदणी आवश्यक आहे. क्लिनिकची नोंदणी नसल्याकारणाने बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन कार्यवाही करणे अवघड होते. अशा आस्थापनांची नोंदणी करणेकरिता कोणताही शासन निर्णय किंवा शासन आदेश उपलब्ध नाही, परंतु महापालिकेची आरोग्य व्यवस्था सुदृढ करण्यासाठी खाजगी रुग्णालय, एमटीपी सेंटर व सोनोग्राफी सेंटर सोबतच पॅथॉलॉजी लॅब व क्लिनिक, दवाखाना, डे-केअर युनिट, हेल्थ केअर युनिटची निःशुल्क नोंदणी महानगरपालिका वैद्यकिय आरोग्य विभागाद्वारे करण्याविषयीची सकारात्मक चर्चा या बैठकीत करण्यात आली.