अलिबाग : प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे रायगड जिल्हयात भातापीकावर कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. जिल्ह्यात पोलादपूर परीसरात निळा भुंगेरा, माणगाव भागात नाकतोडा तर पेण परीसरात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्हयात साधारण एक लाख 10 हजार हेक्टर हे भाताचे क्षेत्र आहे. यंदा लावणीची कामे उशिरा सुरू होवून उशिरा पूर्ण झाली. परंतु अखेरच्या टप्प्यात झालेला पाऊस शेतीला पूरक ठरला आहे. लावणी पूर्ण झाली असून पिके तरारून वर आली आहेत. हिरवीगार शेती बहरलेले चित्र सर्वत्र पहायला मिळत आहे. परंतु सध्या असलेले ढगाळ वातावरण शेतीला मारक ठरते आहे. शेतीवर कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. पोलादपूर परीसरात निळा भुंगेरा, माणगाव भागात नाकतोडा तर पेण परीसरात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. तर अधिकचा पाऊसदेखील शेतीला मारक ठरू शकतो.
यंदा मान्सून दाखल झाल्यानंतर जूनच्या सुरूवातीला फारसा बरसला नाही. जून महिन्याच्या 3 तारखेला आलेल्या चक्रीवादळादरम्यान मोठा पाऊस झाला मात्र त्यांनतर त्याने पाठ फिरवली. त्यामुळे पावसाच्या मूळ महिन्यातच कमी म्हणजे सरासरीच्या 80 टक्के इतका पाऊस झाला. जुलै महिन्यातदेखील पावसाची सरासरी 83 टक्के इतकीच होती. यावर्षी पेरण्या वेळेवर झाल्या मात्र चक्रीवादळामुळे लावणीची कामे खोळंबली. ग्रामीण भागात चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. त्यातून सावरण्यात शेतकरयांना वेळ गेला परीणामी लावणीची कामे उशिरा सुरू झाली ऑगस्टच्या दुसरया आठवडयापर्यंत ही कामे सुरूच होती. ऑगस्टमध्ये आतापर्यंत सरासरीच्या 177 टक्के पाऊस झाला आहे. या पावसामुळे भातशेतीला फायदा झाला. परंतु भात पिकावर झालेल्या कीड रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकर्यांची चिंता वाढली आहे.
जिल्ह्याच्या काही भागात भातावर कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सध्या पाऊस सुरू असल्याने फवारणी करणे योग्य नाही. पाऊस थांबल्यानंतर कडक ऊन पडल्यावर शेतकरयांनी फवारणी करून घ्यावी.
-पांडुरंग शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी