Breaking News

वहाळ ग्रामपंचायतीमध्ये शेकापने युतीधर्म न पाळता अडीच वर्षांनंतरही सरपंचपद ठेवले स्वतःकडेच

पनवेल ः रामप्रहर वृत्त
वहाळ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत झालेल्या युतीधर्माच्या समझोत्याला हरताळ फासत शेतकरी कामगार पक्षाने अडीच वर्षांनंतरही सरपंचपद आपल्याचकडे ठेवत गद्दारी केली आहे, असा घणाघात उपसरपंच तथा भाजप गव्हाण जि. प. विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे आणि भाजप, काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
गव्हाण आणि वहाळ ग्रामपंचायतीच्या सन 2018मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शेकाप, काँग्रेस यांच्यात स्थानिक पातळीवर युती होऊन सरपंचपदाचा कार्यभार अडीच-अडीच वर्षे वाटून घेण्याचे ठरले होते. या बैठकीला भाजपकडून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शेकापकडून राजेंद्र पाटील, काँग्रेसकडून महेंद्र घरत प्रामुख्याने उपस्थित होते.
समझोत्यानुसार गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये पहिली अडीच वर्षे भाजपचा सरपंच होता, तर सध्या सरपंचपद शेकापकडे आहे, मात्र अडीच वर्षांनंतरही वहाळ ग्रामपंचायतीमधील सरपंचपद सोडण्यास शेकाप तयार नाही. वहाळमध्ये शेकापच्या सरपंचाने 15 जानेवारी 2019 रोजी कार्यभार हाती घेतला होता. त्याला येत्या जानेवारीमध्ये तीन वर्षे पूर्ण होतील. समझोत्यानुसार अडीच वर्षांनंतर सरपंचपद भाजपला देणे अपेक्षित असताना शेकापने गुळाला मुंगळा चिटकल्याप्रमाणे सरपंचपद स्वत:कडेच ठेवले आहे, अशी टीका उपसरपंच तथा भाजप गव्हाण जि. प. विभागीय अध्यक्ष अमर म्हात्रे, भाजप ग्रामपंचायत सदस्य मंजुळा सुरेश कोळी, गीता नंदकुमार ठाकूर, काँग्रेसच्या सदस्य योगिता अश्विन नाईक यांनी केली आहे. शेजारील गव्हाण आणि न्हावे ग्रामपंचायतीमध्ये भाजपकडून युतीधर्म पाळला जात असताना वहाळमध्ये शेकापकडून का गद्दारी केली जाते? शेकाप येथे युतीधर्म का पाळत नाही, असा सवालही त्यांनी केला आहे.
दरम्यान, वहाळमधील शेकापच्या एककल्ली कारभाराची झळ नागरिकांनाही बसत आहे. जन्म-मृत्यू व इतर दाखले तसेच सोयीसुविधांसाठी नागरिकांना ग्रामपंचायत कार्यालयात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तरीदेखील त्यांची कामे होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत स्थानिक शेकाप नेते राजेंद्र पाटील यांनी निर्णय घेऊन युतीधर्म पाळावा आणि नागरिकांचीही रखडपट्टी टाळावी, असे उपसरपंच अमर म्हात्रे आणि भाजप, काँग्रेसच्या ग्रामपंचायत सदस्यांनीम्हटले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply