Breaking News

काँग्रेसमध्ये निष्ठावंत वि. बंडखोर!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गलितगात्र झालेल्या काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक शनिवारी (दि. 19) हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या ‘10 जनपथ’ या निवासस्थानी झाली. माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि महासचिव प्रियंका गांधी-वढेरा याही बैठकीला उपस्थित होत्या. या वेळी पक्षांतर्गत निवडणुकांच्या मुद्द्यावर बंडखोर काँग्रेस नेते ठाम राहिले. काँग्रेस अध्यक्षच नव्हे तर, कार्यकारी समिती आणि संसदीय मंडळाच्या सदस्यांच्या नियुक्तीसाठीही निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी या नेत्यांनी केल्यामुळे राहुल गांधींचे निष्ठावान आणि ज्येष्ठ नेत्यांमधील मतभेद कायम असल्याचे स्पष्ट झाले.

पक्षनेतृत्वाच्या कार्यपद्धतीवर टीका करणारे पत्र 23 बंडखोर काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांना ऑगस्टमध्ये पाठवले होते. त्यानंतर शनिवारी पहिल्यांदाच सोनिया यांनी निवासस्थानी ज्येष्ठ नेत्यांची बैठक घेतली. गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, शशी थरूर, पृथ्वीराज चव्हाण, भूपेंद्र सिंह हुडा, मनीष तिवारी आदी बंडखोर नेते तसेच ए. के. अ‍ॅन्टनी, अंबिका सोनी, अशोक गेहलोत, कमलनाथ, हरीश रावत, पवन बन्सल, अजय माकन आदी गांधी निष्ठावान यावेळी उपस्थित होते. मात्र, राहुल गांधी यांच्या निकटचे मानले जाणारे रणदीप सुरजेवाला, के. सी. वेणुगोपाल  गैरहजर होते. या वेळी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

बंडखोर नेत्यांच्या पत्रात पी. चिदंबरम यांचा समावेश नसला तरी त्यांनी बंडखोर नेत्यांना पाठिंबा दिला आहे. दिल्लीतील अखिल भारतीय काँग्रेस समितीचे मुख्यालय पूर्ण वेळ कार्यरत राहिले पाहिजे, असा मुद्दा चिदंबरम यांनी बैठकीत मांडला. त्यांचा रोख राहुल गांधी यांच्यावर असल्याचे समजते, तर राहुल यांनी बैठकीत बंडखोर नेत्यांना भावनिक आवाहन करण्याबरोबरच त्यांच्यावर टीकाही केल्याचे कळते.

Check Also

पनवेलमध्ये भाजप स्थापना दिन उत्साहात साजरा

पनवेल : रामप्रहर वृत्तजगातील सर्वात जास्त सदस्य असलेल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस सोमवारी (दि. …

Leave a Reply