Breaking News

सिडकोच्या नवीन घरांची सोडत 15 जानेवारीला

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सध्या सुरू असलेल्या सिडकोच्या 24 हजार बांधकामांपैकी सात हजार लाभार्थीनी घरांची सर्व रक्कम भरल्याने वर्षअखेरपर्यंत त्यांच्या घरांची नोंदणी, करारनामे आणि ताबा अशी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडको पाच हजार नवीन घरांची सोडत काढणार आहे. ही सोडत 15 ते 26 जानेवारी दरम्यान काढली जाईल असे समजते. सिडकोने यापूर्वीच्या सोडती या महापुरुषांच्या जयंती निमित्ताने काढलेल्या आहेत. महागृहनिर्मितीत सिडकोचे कोट्यवधी रुपये अडकल्याने लवकरात लवकर तयार घरे, तसेच यापूर्वी शिल्लक राहिलेली 900 घरांची विक्री पुढील वर्षांच्या प्रारंभी सुरू केली जाणार आहे. यामुळे सिडकोच्या तिजोरीत भर पडणार आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन वर्षांतील पाच हजार घरांची नुकतीच घोषणा केलेली आहे. सिडको पाच नोडमध्ये 24 हजार घरांचे बांधकाम करीत आहे. त्यासाठी 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून सिडकोची तिजोरी या बांधकामामुळे खाली झाली आहे. त्यामुळे निधी उभारण्याचे अनेक मार्ग सिडको सध्या अंगीकारत असून यात बांधून तयार होत असलेली किंवा एक दोन वर्षांत उभ्या राहणार्‍या इमारतीतील घरांची विक्री करण्याचा कार्यक्रम सिडकोच्या पणन विभागाने तयार केला आहे. अडीच वर्षांपूर्वी टप्प्याटप्प्प्याने काढण्यात आलेल्या सहा सोडतींत सिडकोने 24 हजार घरांचे वाटप केलेले आहे, मात्र यात सात हजारांपेक्षा जास्त लाभार्थी अपात्र ठरलेले आहेत. अपात्र ठरलेल्या लाभार्थीच्या जागी प्रतीक्षा यादीवरील लाभार्थींना घरांचे वाटप केले जात असून यातील अनेक लाभार्थींनी घराची सर्व रक्कम भरून घरांचे ताबे घेण्यास सुरुवात केली आहे. बँकेचे हप्ते आणि भाडे या दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी लाभार्थींनी घर लवकर मिळावे यासाठी सिडकोकडे विनंती केलेली आहे. त्यांना लवकरात लवकर घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया राबवली जात असून पणन विभागाने सकारात्मक दृष्टिकोन दाखविला आहे. सात हजार 226 घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सिडको पाच हजार घरांची सोडत काढणार आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी ही सोडत राहणार असून 15 जानेवारीपर्यंत ही सोडत काढण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. सिडकोने यापूर्वी 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोबर, दिवाळी अशा महत्त्वाच्या दिवशी सोडती काढलेल्या आहेत. त्यामुळे ही सोडतदेखील 26 जानेवारी रोजी काढली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. छाननी प्रक्रियेत सात हजार अर्ज बाद झाले असून नागरिक सहज म्हणून ऑनलाइन अर्ज करीत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे सिडको प्रशासनाचा नाहक वेळ वाया जात असून कर्मचार्‍यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सर्व अटी व शर्ती यांची पूर्तता करणार्‍या नागरिकांनी विचारपूर्वक अर्ज दाखल करावेत, अशी अपेक्षा सिडकोकडून व्यक्त केली जात आहे. काही हजार रुपयांच्या अनामत रकमेत हे अर्ज करता येत असल्याने अनेक नागरिक अर्ज करीत असल्याने बांधकाम खर्चाच्या 10 टक्के रक्कम आकारण्यात यावी, असा मतप्रवाह सिडको वर्तुळात आहे, पण या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. त्यामुळे 25 लाख रुपये किमतीच्या घरासाठी अडीच लाख रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply